'सगळे आनंद बाप होण्यापुढे पायाची धूळ…'; संकर्षण कऱ्हाडेने 'फादर्स डे' निमित्त शेअर केली हृदयस्पर्शी कविता, पाहा व्हिडीओ
जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी दरवर्षी ‘फादर्स डे’ सेलिब्रेट केला जातो. ‘फादर्स डे’च्या निमित्ताने आज प्रत्येकजण सोशल मीडियावर आपल्या वडिलांसाठी कविता किंवा पोस्ट शेअर करताना दिसत आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपल्या वडिलांचं स्थान फार वेगळं आहे. बॉलिवूडसह मराठी फिल्म इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी आपल्या वडिलांना शुभेच्छा देणारी पोस्ट शेअर केली आहे.
‘Sardaar Ji 3’ चा धमाकेदार टीझर प्रदर्शित, दिलजीत दोसांझने पुन्हा एकदा जिंकले चाहत्यांचे मन!
आजच्या दिवशी मुलं आपल्या वडिलांप्रती असलेले प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करताना दिसतात, आजच्या दिवशी त्यांच्याप्रती प्रेम व्यक्त करण्याची सगळ्यांनाच संधी असते. त्याचनिमित्त प्रत्येकजण आपल्या वडिलांसाठी खास पोस्ट शेअर करत आपल्या मनातल्या भावना व्यक्त करताना दिसत आहे. अशातच अनेक मराठी सेलिब्रिटींप्रमाणे अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने सुद्धा ‘फादर्स डे’निमित्त खास पोस्ट शेअर केली आहे. ‘फादर्स डे’निमित्त पोस्टमध्ये अभिनेत्याने वडीलांसाठी एक खास कविता लिहिली आहे.
मराठी सेलिब्रिटी वडिलांच्या आठवणीत भावूक; म्हणाले, “चांगला बाबा होण्याचे सगळेच रेकॉर्ड्स मोडले तू…”
संकर्षणने इन्स्टाग्रामवर कवितेचा व्हिडीओ शेअर केला आहे आणि या व्हिडीओत तो असं म्हणतो, “नमस्कार, लहान मुलं देवाघरची फुलं असं आपण म्हणतो; पण आजकालची लहान मुलं इतकी डेंजर आहेत की त्याला विचारू नका. थकून आलेल्या बापाला सुद्धा कोमेजून टाकतात अशी डेंजर मुलं आहेत. तर विशेषतः त्या वडिलांसाठी आणि त्यांच्या मुलांसाठीची ही कविता.”
“नाटकाचा प्रयोग प्रवास करून हा नट दमून जातो
पायाची लाकडं, चालत वाकडं घरी दमून येतो
वाटत असतं आपलं बुड आपल्याच घरात शांतपणे टेकवावं
थकून आलास रे आराम कर हे वाक्य मला कोणी तरी ऐकवावं
बायकोच्या नजरेत भाव असतात, आलं आमचं खुळं
आणि वाघाने फडशा पाडावा तसं अंगावर पडतात जुळं
माझ्या छातीपासून पोटापर्यंत ते खेळतात घसरगुंडी
अन् कुंभाराने माती तुडवावी तशी तुडवतात माझी मांडी
माझ्या उरल्या सुरल्या केसांची होते रोपवेची दोरी
बापाच्या रूपाने त्यांना वाटतं गार्डनच आलंय घरी
पाठीच्या घोड्याला गुडघ्याच्या गाडीला घराचा प्रवास घडतो
तिकडून दिवसभर मी कशी सांभाळते हा मंत्र पडतो
मग मोबाईल चुंबक देऊन त्यांचं वळवायचं ध्यान
ते रमलेत तोवर घ्या गिळून म्हणून समोर येतं जेवणाचं पान
वेगळं काहीतरी केलंय म्हणून समोर पानात असतात छोले
पहिला घास घेतला की पोरं करतात डायपर ओले
आपण भरेपर्यंत पोरांची भरलेली पोटं मोकळी होतात
ते जेवताना घासासोबत आपला जीवसुद्धा खातात
रात्र चढेल तसा रंगत जातो त्यांचा खेळ
कोल्हा आलाय बरं आता झालीय तुमची झोपायची वेळ
बरं पोरं झोपली आहेत तोपर्यंत तरी वाटतं ना काहीतरी व्हावं
बाळांना बाजूला करून आईला जवळ घ्यावं
त्याच रात्री पोरं दोन वाजेपर्यंत जागतात
जरा झोपलेत असं वाटलं की उठून पाणी मागतात
मग कानाशी येऊन म्हणतात, बाबा खरंच कोल्हा आला का?
नका चिडू ना बाबा तुम्हाला खरंच खूप त्रास दिला का?
बाबा म्हणतात सगळे आनंद बाप होण्यापुढे पायाची धूळ आहे
बाळांनो तुमच्यामुळे माझं घर भरलेलं गोकुळ आहे
बाळांच्या कुशीत त्यांचा बाप शांतपणे झोपतो
दुसऱ्या दिवशी बापातला नट जोमाने काम करतो