‘वामा- लढाई सन्मानाची’ चित्रपटातील ‘रेशमी धागे विरून गेले’ भावनिक गाणे प्रदर्शित
स्त्री सशक्तीकरण व महिला आत्मसन्मान यावर भाष्य करणारा ‘वामा- लढाई सन्मानाची’ हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला असून चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. आता या चित्रपटातील ‘रेशमी धागे विरून गेले’ हे भावनिक गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याला मंजिरा गांगुली यांचा आवाज लाभला असून मंदार चोळकर यांनी हे गाणे शब्दबद्ध केले आहे. तर रिजू रॉय यांनी या गाण्याला संगीत दिले आहे.
यात सरलाच्या आयुष्यातील तुटलेल्या आशा, हरवलेले प्रेम, नवऱ्याच्या अहंकारामुळे होणारा अपमान अशा भावनांचा प्रवास पाहायला मिळतो. गाण्याबद्दल दिग्दर्शक अशोक आर कोंडके म्हणतात, “ ‘रेशमी धागे विरून गेले’ हे गाणे सरलाच्या मनातील घालमेल उलगडते. एक स्त्री जेव्हा तिच्या जवळच्या माणसांकडूनही उपेक्षा आणि दुःख अनुभवते, तेव्हा तिच्या अश्रूंमधून ज्या भावना व्यक्त होतात, हेच या गाण्यात दाखवण्यात आले आहे.”
अभिनेता Tanuj Virwani च्या घरी झाली चोरी, जवळच्या व्यक्तीने कोट्यवधींच्या वस्तुंवर मारला डल्ला
निर्माते सुब्रमण्यम के. म्हणतात, “ ‘वामा – लढाई सन्मानाची’ हा चित्रपट समाजात स्त्रीच्या अस्तित्वासाठी सुरू असलेल्या संघर्षाचा आरसा आहे. ‘रेशमी धागे विरून गेले’ या गाण्याच्या प्रत्येक ओळीत एक हतबल स्त्रीची हाक आहे. हा चित्रपट म्हणजे हजारो सरलांचे प्रतिनिधित्व करणारे वास्तव आहे.”
ओंकारेश्वरा प्रस्तुत व सुब्रमण्यम के. निर्मित ‘वामा – लढाई सन्मानाची’ चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन अशोक आर. कोंडके यांनी केले असून कश्मीरा कुलकर्णी, डॉ. महेश कुमार, गणेश दिवेकर, जुई बी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.