Aata Hou De Dhingana: स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मनोरंजन कार्यक्रम ‘आता होऊ दे धिंगाणा’चा पाचवा सीजन सुरू आहे. या शोमधील ‘साडे माडे शिंतोडे’ हा गेम प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रिय होता.

स्टार प्रवाहचा लाडका शो आता होऊ दे धिंगाणा, याचा पाचवा सीजन सुरू आहे. सगळ्या मालिकांचे कलाकार एका स्टेजवर येऊन धमाल करतात.

या शोमध्ये सगळ्यात जास्त आवडणारा गेम म्हणजे ‘साडे माडे शिंतोडे’. गाण्याचे शब्द ओळखायचे, चुकलं की तोंडावर पाण्याचा फवारा.

या गेममुळे कलाकार पूर्ण भिजायचे. अचानक पाणी अंगावर आल्याने त्यांची धांदल उडायची, आणि हेच पाहायला लोकांना मजा यायची.

पण आता एक मोठी बातमी आहे. चॅनेलने हा गेम पुढच्या भागांपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे हा गेम शूट होणार नाही.

महाराष्ट्रात यंदा पाऊस खूप कमी झाला आहे. बऱ्याच गावात दुष्काळ आहे. लोकांना पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट करावी लागते. म्हणून पाण्याचा अपव्यय नको म्हणून हा निर्णय घेतला.

सिद्धार्थ जाधव म्हणाला, हा गेम आम्हा सगळ्यांना खूप जवळचा होता, खूप धमाल केली यात. पण पाणी ही आपली सगळ्यात मोठी संपत्ती आहे. मनोरंजन करता करता सामाजिक भान पण ठेवायला हवं. त्यामुळे हा गेम बंद करतोय.बिझनेस हेड सतीश राजवाडे पण म्हणाले, एखादी हिट गोष्ट बंद करणं सोपं नसतं, पण समाजाचा विचार करून हा निर्णय घ्यावा लागला.






