
एका कंत्राटदाराने सत्ताधारी 21 आमदारांना दिली 25 कोटींची डिफेंडर कार गिफ्ट; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा गंभीर आरोप
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. असे असताना आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. राज्यातील सत्ताधारी 21 आमदारांना एका कंत्राटदराने 21 महागड्या ‘डिफेंडर’ कार गिफ्ट दिल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला.
हर्षवर्धन सपकाळ यांनी अशाप्रकारे आरोप केल्याने आता हे २१ आमदार कोण? आणि गिफ्ट देणारा कंत्राटदार कोण? असा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे. याचे उत्तर लवकर मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही. एक महागडी कार बुलढाण्यात आली ती या २१ मधील आहे की २२ वी आहे? ते सर्वांनी मिळून शोधू असेही ते म्हणाले. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी दिवाळीत दीड कोटी रुपये किमतीची डिफेंडर गाडी घेतली. आमदाराच्या या कारवरुन बुलढाण्यात चांगल्याच चर्चा रंगू लागल्या.
हेदेखील वाचा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपकडून तयारी सुरु; महायुतीच्या कार्यकर्त्यांना दिल्या ‘या’ सूचना
यामध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विजयराज शिंदे यांनीही ही कार एका कंत्राटदाराने दिली असल्याचा दावा केला होता. त्यानंतर या आरोपावर गायकवाड यांनी ही गाडी नातेवाईकांची असून, ती काही दिवसांसाठी वापरण्यासाठी आणली असल्याचे सांगितले. यावर त्यांना कारवर आमदाराचे स्टिकर असल्यासंदर्भात विचारणा केली असता गायकवाड यांनी माझ्या अनेक कार्यकर्त्यांच्या गाड्यावर स्टिकर असल्याचा खुलासा केला. त्यात असे काही नवीन नाही, असे सांगितले. या सर्व आरोप-प्रत्यारोपानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी महागड्या कारच्या वादात उडी घेतली.
वाहनांवर स्टिकर लावता येणार नाही
माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सपकाळ म्हणाले, संविधानानुसार कोणाच्याही वाहनाला असे स्टिकर लावता येत नाही. याच कारणामुळे सर्वसामान्य नागरिकांचा गोंधळ होतो. आमदार, खासदारांच्या वाहनाला स्टिकर लावणे योग्य नाही. आपणही आमदार होतो. पण आपल्या कुठल्याही वाहनाला असे स्टिकर नव्हते. एवढेच काय तर मी सुरक्षा रक्षकही घेतला नव्हता. मी वेगळ्या विचाराने जगणारा सामान्य कार्यकर्ता आहे
दुसरा नारा येऊ पाहतोय
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले, गतकाळात ‘पन्नास खोके आणि एकदम ओके’ असा नारा महाराष्ट्रात बुलंद झाला होता. आता दुसरा नारा येऊ पाहत आहे. दिवाळीचे फटाके फोडत असताना महाराष्ट्रातील सत्ताधारी आमदारांना २१ महागड्या एका कंत्राटदाराने भेट दिल्या आहेत.