Agriculture Minister Manikrao Kokate assured that he would remain sensitive towards farmers.
Manikrao Kokate : मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे चर्चेमध्ये आले आहेत. माणिकराव कोकाटे हे विधीमंडळामध्ये जंगली रमी खेळताना दिसून आले होते. कोकाटे हे पावसाळी अधिवेशन सुरु असताना विधान परिषदेच्या सभागृहामध्ये पत्त्यांचा डाव खेळत होते. यावरुन विरोधकांनी जोरदार टीका केल्यानंतर राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र मी पत्ते खेळतच नव्हतो असे म्हणत कृषीमंत्री कोकाटे यांनी दावा फेटाळला होता. यानंतर आता कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना उपरती आल्याचे दिसून आले आहे.
देशामध्ये महाराष्ट्र हा शेतकरी आत्महत्येमध्ये दुर्दैवाने पहिल्या क्रमांकावर आहे. कर्जमाफी मिळत नसल्यामुळे बळीराजा मेटाकुटीला आला आहे. असे असताना राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे गेम खेळत असल्याचे आढळून आले. यामुळे माणिकराव कोकाटे यांच्यावर चौफेर टीका होऊ लागली. तसेच विरोधकांनी माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली. यावर कोकाटे यांनी गेम खेळत नसून जाहिरात पुढे घेत असल्याचे म्हणत विषय गुंडाळण्याचा प्रयत्न केला. मात्र यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी भेट घेत प्रकरण जाणून घेणार असल्याचे सांगितले होते. कोकाटे आणि पवारांची भेटीची शक्यता असताना माणिकराव कोकाटे यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
एका वाहिनीशी संवाद साधताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबाबत संवेदनशील असण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. माणिकराव कोकाटे म्हणाले की, “कृषी क्षेत्र व शेतकऱ्यांचे प्रश्न हे अत्यंत संवेदनशील विषय आहेत. या क्षेत्रातील कोणत्याही प्रश्राबद्दल अथवा समस्येबद्दल भाष्य करताना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची मी निश्चितपणे दक्षता घेईन,” असे आश्वासन आता कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिले आहे. त्यामुळे उशीरा का होईन कोकाटे यांना शहाणपण आले असल्याचे बोलले जात आहे.
पुढे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले की, “शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत अधिक सकारात्मक पद्धतीने त्यांच्याशी संवाद साधुन त्यांच्या प्रश्नांबाबत कृषी विभागाच्या माध्यमातून तातडीने उपाययोजना करण्याचा मी प्रयत्न करेन,” असे देखील राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली होती. माणिकराव कोकाटे यांच्याबाबत अजित पवार म्हणाले होते की, “कृषीमंत्री कोकाटे यांच्या बाबतीत मला जी माहिती मिळाली ती घटना सभागृहाच्या आत घडलेली आहे. आता हे तुम्हालाही माहिती आहे की विधानभवनाचा जो परिसर आहे तो परिसर विधानसभेचे अध्यक्ष आणि विधानपरिषदेचे सभापती यांच्या अखत्यारीत येतो. कृषीमंत्र्यांच्या व्हिडीओबाबत विधानसभा अध्यक्षांनी आणि विधानपरिषदेच्या सभापतींनी देखील चौकशी सुरू केली आहे, अशी माहिती मला मिळाली आहे. सोमवारी मी त्यांच्याशी समोरासमोर चर्चा करेल.” असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.