
Ahilyanagar News: शंकरराव गडाखांची स्वतंत्र खेळी सत्ताधाऱ्यांसाठी धोक्याची, नेवासेत राजकीय उलथापालथ अटळ?
नेवासा नगरपंचायत निवडणुकीत क्रांतीकारी शेतकरी पक्षाने १७ पैकी तब्बल १० जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले. नगराध्यक्षपदासह उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्यांवरही गडाख गटाने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. हा विजय केवळ संघटनबळाचा नव्हता, तर भाजप-शिवसेना युतीतील अंतर्गत नाराजीचा स्पष्ट आरसा असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
Maharashtra Politics : स्वीकृत नगरसेवक म्हणून गोपाळ भगत यांच्या नावाची चर्चा
शिवसेना (शिंदे गट) ने पहिल्यांदाच नगराध्यक्षपद मिळवले असले, तरी भाजपमधील अस्वस्थता उघडपणे समोर आली. आमदार विठ्ठलराव लंघे यांनी ‘आम्हाला विश्वासात घेतले गेले नाही’ अशी तक्रार केल्याने भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांमधील नाराजी स्पष्ट झाली. याचा थेट फटका सत्ताधारी युतीला बसल्याचे निवडणूक निकालातून अधोरेखित झाले.
नेवाशातील भाजपमधील अंतर्गत गटबाजी ही काही नवीन बाब नाही. माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या पक्षांतराच्या चर्चांपासून ते परस्पर आरोप-प्रत्यारोपांपर्यंत पक्षांतर्गत धुसफूस सातत्याने सुरू आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन आमदार लंघे यांनी शिवसेना संघटन वाढवण्यावर भर दिल्याच्या चर्चा आहेत. मात्र, यामुळे भाजप-शिवसेना युतीतील विसंवाद अधिकच तीव्र झाल्याचे चित्र आहे.
सध्याच्या राजकीय अस्थिरतेचा सर्वाधिक फायदा माजी मंत्री शंकरराव गडाख यांना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पक्षचिन्हांपेक्षा स्थानिक नेतृत्व, थेट जनसंपर्क आणि संघटनात्मक बांधणीवर भर देणारी त्यांची रणनीती जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत निर्णायक ठरू शकते. आगामी निवडणुका सत्ताधाऱ्यांसाठी जनतेचा कौल ठरणार असल्याचा दावा गडाख समर्थकांकडून केला जात आहे.
BMC Mayor Reservation : मुंबईवर कोण करणार ‘राज’? आरक्षण जाहीर होताच ‘या’ महिला नेत्यांची रंगली चर्चा
युवा नेते प्रशांत गडाख यांच्या आजारपणामुळे मागील विधानसभा निवडणुकीत गडाख गटाला फटका बसल्याचे मानले जाते. मात्र आता माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील गडाख यांची सक्रिय भूमिका गडाख गटासाठी नवे बळ ठरत असल्याचे दिसून येते. जिल्हा परिषद निवडणुकांचा अनुभव, विविध राजकीय गटांशी असलेली संपर्कसाखळी आणि संघटनात्मक हालचाली यामुळे सुनील गडाख हे शंकरराव गडाखांच्या राजकारणातील महत्त्वाचा दुवा ठरू शकतात.
एकीकडे भाजप-शिवसेना युतीतील अंतर्गत संघर्ष तीव्र होत असताना, दुसरीकडे क्रांतीकारी शेतकरी पक्ष हा पर्याय नेवाशातील मतदारांमध्ये वेगाने स्वीकारला जात आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका या केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न राहता, नेवाशातील सत्ताधाऱ्यांसाठी अस्तित्वाची लढाई ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.