Ajit Pawar expressed his views on loan waiver and compensation for farmers Wardha
वर्धा : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे वर्धाच्या दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांनी आढावा घेत अधिकाऱ्यांना सूचना देखील दिल्या आहेत. यानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. अजित पावर यांनी वर्धामधील विकासासाठी नियोजन, आराखडा आणि अर्थिक नियोजन यावर भाष्य केले आहे. यावेळी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल देखील माध्यमांनी त्यांना प्रश्न केला. यावेळी योग्य वेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ अशी घोषणा अजित पवार यांनी केली आहे.
राज्यामध्ये यापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि आता होत असलेल्या तुफान पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेकडो एकर जमीन ही पाण्याखाली गेली असून त्यांचे पंचनामे करणे सुरु आहे. याबाबत मत व्यक्त करताना अजित पवार म्हणाले की, “अतिवृष्टी नुकसान भरपाई देण्याला कुठलीही अडचण नाही. विभागीय आयुक्त यांनी नुकसानीचे प्रस्ताव पाठविले का हे तपासणार आपल्याकडे निधी आहे, त्याची चिंता नाही. काल कॅबिनेटमध्ये मदत देण्याचा निर्णय झाला, मी मुंबईत गेल्यावर यावर निर्णय करणार आहे. पालकमंत्री त्या त्या जिल्ह्यातील आढावा घेऊन पुढल्या कॅबिनेटमध्ये स्टँडिंग ऑर्डर देऊ. काही भागात प्रचंड नुकसान झालं आहे, काही भागात रेड अलर्ट तीन दिवस होता पण आता अलर्ट कमी होत आहे. PWD कॉन्ट्रॅक्टरचे पैसे लवकरच देण्यात येणार त्यांच्यावर अशी वेळ येणार नाही याची काळजी महायुती सरकार घेत आहे,” अशी भूमिका अजित पवारांनी घेतली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून कर्जमाफी देण्यात आलेली नाही. याबाबत अनेकदा मागणी केली जात असून विरोधक देखील आक्रमक झाल्याचे दिसून येतात. याबाबत अजित पवार म्हणाले की, “100 वर्षात मे महिन्यात पहिल्यांदा इतका पाऊस पडला, हा निसर्गाचा कोप म्हणून मार्ग काढला जातोय. आम्ही आधी शेतकरी आत्महत्या होऊ नये म्हणून विविध योजना आणतो. शेतकऱ्यांना शुण्य टक्के व्याजाने कर्ज देतो. राजकारणात चढउतार असतात. योग्य वेळ आल्यावर शेतकरी कर्जमाफी करणार. योग्य वेळ कधी येणार ते आम्ही सांगू. आमच्या जाहिरनाम्यात ते होतं. २० हजार कोटींची वीज माफी दिली. लाडकी बहिण योजना आहे.मी शेतकरी आहे. पाणी शिल्लक असलं तरच पिकांचं नियोजन होतं. मी त्यात काय चुकीच बोललो असे प्रश्न विचारू नका, मी मागे चुकीचं बोललो त्याची किंमत मला 10 वर्ष चुकवावी लागेल,” अशी भूमिका अजित पवार यांनी घेतली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना महायुती सरकारकडून कर्जमाफी मिळण्याची शक्यता वाढली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
खासदार सुनेत्रा पवार या राष्ट्र सेवा समितीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटावर टीका केली जात आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माध्यमांनी प्रश्न विचारला. याबाबत अजित पवार म्हणाले की, “मी विचारतो. मला याबद्दल माहिती नाही. माझी बायको सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठे कुठे जाते याची मिनिट मिनिटची माहिती माझ्याकडे नसते. मी आता विचारतो. काय गं कुठे गेली होती?” असे खोचक प्रत्युत्तर अजित पवार यांनी दिले आहे.