Amol Mitkari doubted the appointment of IPS officer Anjana Krishna, who clash with Ajit Pawar
Anjana Krishna appointment doubt : सोलापूर : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जोरदार चर्चेमध्ये आले आहेत. अजित पवार यांनी एका महिला अधिकाऱ्यांना कारवाई करताना धमकी दिल्याचे समोर आले आहे. याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर अजित पवार यांच्यावर चौफेर टीका होऊ लागली आहे. विरोधकांनी अजित पवारांवर हल्लाबोल केल्यानंतर अखेर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र आता अजित पवार गटातील आमदार अमोल मिटकरी यांनी अंजना कृष्णा यांच्या नियुक्तीवर संशय घेतला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बेकायदेशीर खडी उपसा प्रकरणावर थेट कारवाई करणाऱ्या आयपीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यावर फोनवर बोलणं करुन कारवाई थांबवण्यास सांगितले. मात्र अधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांच्या फोनवरुन मला फोन करण्यापेक्षा माझ्या फोनवर फोन करा असे सांगितले. यामुळे अजित पवार यांचा पारा चढल्याचे दिसून आले. यानंतर अंजना कृष्णा यांच्या पोस्टिंगवरुन अजित पवार गटाच्या नेत्यांकडून संशय घेतला जात आहे. आयपीएस अंजना कृष्णा यांचे शैक्षणिक, जात प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करावी, अशी मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
आमदार अमोल मिटकरी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पाठराखण केली आहे. ते म्हणाले की, “महिला पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा यांची वागणूक अयोग्य आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बदनामी केली. आयपीएस अधिकाऱ्यांना नियुक्त झालेल्या राज्यातील उपमुख्यमंत्र्यांची माहिती नसेल तर त्यांच्या शिक्षणावर संशय येत आहे. पूजा खेडकरांच्या धर्तीवर केंद्रीय लोकसेवा आयोगाने त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करावी, यासाठी आयोगाला पत्र पाठवले आहे. चौकशी करून तत्काळ निलंबित करावे,” अशी मागणी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.
आय.पी.एस. अंजना कृष्णा द्वारा प्रस्तुत किए गए शैक्षणिक,जाति प्रमाणपत्र तथा अन्य आवश्यक दस्तावेजो की जाँच की जाये । @UPSC_Official pic.twitter.com/dO5z7Nptk0
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) September 5, 2025
पुढे ते म्हणाले की, “अंजना कृष्णा यांच्या नियुक्तीमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असू शकतो. संविधानानुसार सर्वांना समान अधिकार आहेत. त्या महिला अधिकाऱ्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा अवमान केला त्याचे काय?” असा प्रश्न देखील मिटकरी यांनी उपस्थित केला. मात्र यावरुन अजित पवार यांची व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्याच गटातील नेत्यांनी असा संशय व्यक्त केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अजित पवार यांच्यावर चौफेर टीका झाल्यानंतर आणि व्हि़डिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सोशल मीडिया पोस्टमध्ये अजित पवार यांनी लिहिले आहे की, “सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संवादाच्या संदर्भात काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहेत. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत रहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता. आपल्या पोलीस दलाबद्दल तसंच धैर्यानं आणि प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे. माझ्यासाठी कायद्याचं राज्य हेच सर्वात महत्त्वाचं आहे. मी पारदर्शक प्रशासकीय कारभारासाठी आणि बेकायदेशीर वाळू, माती, खडक उपशासह प्रत्येक बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे,” असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत.