सपा नेते अखिलेश यादव यांच्यावर टोटी चोरी अर्थात नळांची चोरी केल्याचा आरोप भाजप आमदार केतकी सिंह यांनी केला (फोटो - सोशल मीडिया)
Akhilesh yadav toti chori Marathi News : पटना : बिहारमध्ये लवकरच विधानसभा निवडणुकींचा रणसंग्राम होणार आहे. यामुळे राजकीय हालचालींना वेग आला असून आरोप प्रत्यारोप देखील केले जात आहेत. बिहारमध्ये वोट चोरीनंतर आता नळ चोरीचा आरोप केला जात आहे. बलियाच्या बांसडीह विधानसभेतील भाजप आमदार केतकी सिंह पुन्हा एकदा त्यांच्या विधानांमुळे चर्चेत आल्या आहेत. त्यांनी समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. यामुळे राजकार तापले आहे.
भाजप आमदार केतकी सिंह या बिहारच्या राजकारणामध्ये जोरदार चर्चेत आल्या आहेत. त्यांनी सपा प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावर नळ चोरीचा आरोप केला आहे. या आरोपानंतर बिहारचे राजकारण तापले असून सपा कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. आता समाजवादी पक्षाने केतकी सिंह यांना कायदेशीर नोटीस पाठवून जाहीर माफी मागण्याची मागणी केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
समाजवादी पक्षाच्या अॅडव्होकेट्स असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष कृष्ण कन्हैया यांनी आमदार केतकी सिंह यांना नोटीस पाठवली आहे. नोटीसमध्ये त्यांनी भाजप आमदार केतकी सिंह यांना १५ दिवसांच्या आत लेखी स्वरूपात जाहीर माफी मागण्यास सांगण्यात आले आहे. जर त्यांनी माफी मागितली नाही तर त्यांच्यावर समाजवादी पक्षाकडून मानहानीचा दावा केला जाणार आहे. समाजवादी पक्षाकडून तब्ब्ल ५ कोटी रुपयांचा मानहानीचा दावा करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे भाजप विरुद्ध समाजवादी पक्ष ही राजकीय लढाई न्यायालयात पोहोचणार आहे. अशा परिस्थितीत केतकी सिंह यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
नळ चोरीचा आरोप पूर्णपणे खोटा : समाजवादी पक्ष
भाजप आमदार केतकी सिंह यांनी तीन सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद घेत सपा नेते अखिलेश यादव यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. भाजप आमदार केतकी सिंह यांनी पत्रकारांना सांगितले की अखिलेश यादव यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातील नळ उपटून ते घेऊन गेले आहेत. नोटीसमध्ये असे म्हटले आहे की केतकी सिंह यांचा हा दावा पूर्णपणे खोटा, दुर्भावनापूर्ण आणि बदनामीकारक आहे. अखिलेश यादव यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी हे विधान देण्यात आले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सोशल मीडिया आणि चॅनेल्सवर व्हायरल व्हिडिओ
नोटीसीनुसार, भाजप आमदाराचे हे विधान टीव्ही चॅनेल्स आणि सोशल मीडियावर प्रसारित झाले. यामुळे सपा कार्यकर्त्यांना नळ चोर म्हणून बदनाम केले जात आहे. याशिवाय, आमदार म्हणाले होते की असे काम सपाच्या डीएनएमध्ये आहे. यामुळे लाखो सपाच्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत असे सपाकडून पाठवण्यात आलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे.
केतकी सिंह काय म्हणाल्या?
बसडीहच्या आमदार केतकी सिंह म्हणाल्या होत्या की या समाजवाद्यांना लाज नाही. इतका अपमान झाल्यानंतर त्यांनी किमान ते नळ परत करतील असे तरी म्हणावे. अखिलेश यादव सर्वांकडून हिशोब मागतात, पण त्यांनी नळांचा हिशोब दिला नाही. साहेब, तुम्ही घेतलेले नळ यूपीच्या लोकांचे आहेत. ते परत करा, लोक त्यांना शोधत आहेत. केतकी सिंहच्या या विधानानंतर सपा महिला शाखेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानाला घेराव घातला होता. त्यामुळे बिहारच्या राजकारणामध्ये आता नळ चोरीचा मुद्दा जोरदार गाजला आहे.