
BJP candidate Pooja More withdrew her candidature for controversial remarks Amruta Devendra Fadnavis
Pooja More withdraws from elections : पुणे : राज्यामध्ये महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. पुणे मुंबईसह 29 पालिकांच्या निवडणूका जाहीर झाल्या आहेत. पुण्यामध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. पुण्यातील शिवसेनेच्या एका उमेदवाराने एबी फॉर्म खाल्ला तर आता एका उमेदवाराला माघार घ्यावी लागली आहे. सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाल्यानंतर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे पूजा मोरे यांना उमेदवारी मागे घ्यावी लागली आहे. यानंतर त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला.
भाजप नेत्या पूजा मोरे या महापालिका निवडणुकीमधील प्रभाग क्रमांक दोनमधील उमेदवार होत्या. त्यांना अधिकृत उमेदवार म्हणून भाजपकडून उमेदवारी देखील मिळाली होती. पूजा मोरे जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र यानंतर त्यांच्यावर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची नामुष्की ओढावली आहे. पूजा मोरे जाधव यांच्याविरोधात जोरदार सोशल मीडिया ट्रोलिंग करण्यात आले. पूजा मोरे यांच्या जुन्या वक्तव्याच्या वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्याचबरोबर स्थानिक नेत्यांनी देखील तीव्र विरोध केल्यामुळे पूजा मोरे यांना उमेदवारी मागे घ्यावी लागली.
हे देखील वाचा : ‘Gen-Z’ लादेखील राजकारणाचे आकर्षण! नोकरी सोडून राजकारणात प्रवेश
पूजा मोरे जाधव यांच्या जुन्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. भाजपकडून उमेदवारी मिळाल्यानंतर पूजा मोरे यांच्या जुन्या व्हिडिओ समोर आल्या आहेत. यामुळे जोरदार टीका करण्यात आली असून स्थानिक नेत्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. यानंतर पूजा मोरे यांनी रडत रडत उमेदवारी मागे घेतली. तसेच पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली आहे. पूजा मोरे आणि धनंजय जाधव यांनी त्यांच्यासोबत झालेला प्रकार हा सोशल मीडियाचा शिकार झाल्याचे म्हटले आहे.
धनंजय जाधव पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले की, आम्ही सोशल मीडियाचे बळी ठरलो आहोत. माझी पत्नी पूजा मोरे हिने अशी वक्तव्य केली नाहीत. ते शब्द तिच्या तोंडी घातले गेले. मराठा आरक्षण आंदोलनावेळी पूजा मोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीबद्दल केलेले ते वक्तव्य नव्हतेच. तसेच पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर केलेल्या विधानाबाबत माझ्या पत्नीने तेव्हाच स्पष्टीकरण दिले होते, असे मत धनंजय जाधव यांनी व्यक्त केले.
हे देखील वाचा : “बाळासाहेब ठाकरे असते तर बांगलादेशात हिंदूंच्या….”, देवकीनंदन ठाकूर महाराजांचे परखड मत
पूजा मोरे यांचे कथित विधान काय होते?
मुळच्या बीडमधील गेवराई तालुक्यातील असलेल्या पूजा मोरे लग्नानंतर पुण्यात आल्या. लग्नापूर्वी त्या मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय होत्या. मूक मोर्चा आणि त्यानंतर झालेल्या विविध आंदोलनात त्यांनी हिरीरीने सहभाग घेतला होता. याच आंदोलनात एकेठिकाणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीबाबत विधान केल्याचा दावा काही सोशल मीडिया हँडल्सवरून करण्यात आला होता. मात्र हे विधान त्यांचे नव्हते, असा दावा पूजा मोरे यांनी केला आहे.
“मुख्यमंत्री फडणवीस आम्ही आरक्षण मागतो, तुमची पत्नी मागत नाहीत, अशा प्रकारचे विधान भी केलेलेच नव्हते. हे विधान करणारी बीडच्या परळीतील एक तरूणी होती, असा दावा पूजा मोरे यांनी केला आहे. मात्र आरोपामुळे मला खूप त्रास झाला, असेही त्या म्हणाल्या.