'Gen-Z' लादेखील राजकारणाचे आकर्षण! नोकरी सोडून राजकारणात प्रवेश
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष सिद्धी वखे यांनी वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी ऐतिहासिक विजय मिळवून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. मोहोळ नगरपरिषदेच्या २०२५ च्या निवडणुकीत एका सामान्य कुटुंबातील तरुणीने ‘जायंट किलर’ ठरत विजय मिळवला आहे. सिद्धी वखे यांनी प्रस्थापित राजकारण्यांना धक्का देत नगराध्यक्षपदाची खुर्ची काबीज केली. त्यांचे आजोबा विश्वनाथ वस्त्रे हे मोहोळचे माजी सरपंच होते. सलग सहावेळा ते ग्रामपंचायत सदस्य होते.
सिद्धी वस्त्रे या मूळच्या मोहोळच्याच रहिवासी आहेत. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण सुरू आहे. निवडणुकीपूर्वी त्या एका सीए फर्ममध्ये अवघ्या ७,००० रुपये पगारावर काम नोकरी करत होत्या. त्यांनी शिवसेना (एकनाथ शिंदे गट) या पक्षाकडून ही निवडणूक लढवली. सिद्धी वस्त्रे यांनी भाजपाच्या अनुभवी उमेदवार शीतल सुशील क्षीरसागर यांचा सुमारे १७० मतांच्या फरकाने पराभव केला. त्यांच्या विजयामुळे प्रस्थापित नेत्यांच्या बालेकिल्ल्यात सामान्य तरुणाईचा विजय होऊ शकतो, हेच जणू सिद्धीने सिद्ध केले आहे.
सिद्धी वस्त्रे यांची मोहोळ शहराच्या विकासाला आधुनिकतेची जोड देण्याचे आश्वासन दिल्याने मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. सरकारकडून मिळणाऱ्या विकासनिधीचा पै न पै भ्रष्टाचाराशिवाय थेट कामासाठी वापरण्याचा त्यांचा संकल्प आहे.
‘मी जनतेची सेवक म्हणून काम करेन, मालक म्हणून नाही,’ हे त्यांचे ब्रीदच त्यांच्या कार्यपद्धतीची दिशा स्पष्ट करते. रायगड जिल्ह्यातील अलिबागच्या नगराध्यक्षा म्हणून अक्षया नाईक या २२ वर्षीय तरुणीची निवड झाली. अक्षया यांना राजकीय वारसा आहे. त्याचे वडील, आई दोघेही नगराध्यक्ष होते.






