
भाजप शहर निवडणुकीची कमान आता आमदार अमित गोरखे यांच्या हाती; निवडणुकीत होणार फायदा
पिंपरी : भाजप पिंपरी-चिंचवड जिल्हा निवडणूक संचालन समितीच्या संयोजकपदी आमदार अमित गोरखे तर सहसंयोजक म्हणून मोरेश्वर शेडगे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आगामी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक कालखंडात संपूर्ण निवडणूक प्रक्रिया राबविणे तसेच उमेदवारांच्या मुलाखती त्यासाठी उमेदवार चयन करणे व निवडणूक प्रचार यंत्रणा कार्यान्वित करणे यासाठी जिल्हा निवडणूक संचालन समितीची भूमिका अत्यंत महत्वाची असते.
राजकीय व संघटनात्मकदृष्ट्या अशा महत्वपूर्ण समितीच्या संयोजकपदी आमदार अमित गोरखे यांची प्रदेश भाजपाने निवड करून त्यांच्यावर मोठा विश्वास व्यक्त केला आहे. या संचालन समितीमध्ये सहसंयोजकपदी संगठन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे यांना जबाबदारी देण्यात आली आहे. पक्षाचा जाहीरनामा प्रमुख म्हणून अमोल देशपांडे यांची तर महायुती मित्र पक्ष समन्वयक म्हणून सदाशिव खाडे, प्रचार यंत्रणा समन्वयक म्हणून विजय फुगे, निवडणूक आयोग संपर्कप्रमुख म्हणून राजेश पिल्ले, सामाजिक संपर्क प्रमुख म्हणून विकास डोळस यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics : ‘एकनाथ शिंदेंना 20 आमदार सोडून जातील’; ठाकरे गटाच्या ‘या’ बड्या नेत्याचं विधान
तसेच विशेष संपर्क प्रमुख संजय मंगोडेकर, युवा संपर्क प्रमुख दिनेश यादव, महिला संपर्क प्रमुख वैशाली खाडे, मीडिया समन्वयक म्हणून संजय पटनी, लाभार्थी संपर्क समन्वयक म्हणून गोपाळ माळेकर यांच्यासोबतच या समितीत राजू दुर्गे, सत्यनारायण चांडक, मधुकर बच्चे, संजय परळीकर, गोरक्षनाथ झोळ, राजू मासुळकर, गुलाब बनकर, अमेय देशपांडे, सचिन राऊत, भूषण जोशी या पदाधिकाऱ्यांना महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.
अमित गोरखे यांच्या निवडीचे पक्ष कार्यकर्त्यांबरोबरच सर्व स्तरांतून स्वागत करण्यात येत आहे व विशेष महत्वाचे म्हणजे या निवडीला भाजपची मातृसंस्था असलेल्या संघ वर्तुळातूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.