
एकनाथ शिंदेंच्या पराभवासाठी भाजपची फिल्डिंग; ठाकरे गटाच्या 'या' नेत्याचं मोठं विधान
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. त्यात ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या पराभवासाठी भाजप स्वतःच प्रयत्नशील असल्याचा आरोप करून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खळबळ उडवून दिली. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची ऐतिहासिक युती झाली असून, तब्बल १८ वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. या निवडणुकीत ठाकरे बंधू १०० हून अधिक जागा जिंकलीत, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला.
मुंबई महापालिका जिंकण्याचा निर्धार भाजपने केल्याचे दिसत असून, त्यासाठी मुंबईत भाजप-शिवसेना शिंदे गटाची युती होणार असल्याचे चित्र आहे. मात्र, युती असूनही ठाण्यात भाजप स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. ठाण्यातील कापूरबावडी जंक्शन आणि तीन हात नाका परिसरात भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठमोठे बॅनर लावून प्रचाराला सुरुवात केली. ‘नमो भारत, नमो ठाणे’ असा उल्लेख असलेले हे बॅनर कमळाच्या चिन्हासह सर्वत्र झळकत असून, भाजपा स्वतंत्र ताकद दाखवण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट होत आहे. याच मुद्द्यावरून खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना धक्कादायक दावा केला आहे.
हेदेखील वाचा : Campaign Rallies of Hindutva leaders: ठाकरे बंधूंना शह देण्यासाठी भाजपची नवी खेळी; हिंदुत्ववादी नेत्यांच्या घेणार प्रचारसभा
भाजपला ठाण्यात एकनाथ शिंदे यांचा पराभव करायचा आहे, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले. शिंदे गट युतीत असतानाही भाजप ठाण्यात स्वतंत्र भूमिका घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. संजय राऊत यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात नवी खळबळ उडाली आहे.
सत्ता समीकरणे बदलतील
राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची ताकद एकत्र आल्यामुळे मुंबईतील तब्बल ६७ प्रभागांमध्ये ठाकरेंची पकड अधिक मजबूत झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या युतीमुळे महापालिकेतील सत्ता समीकरणे पूर्णपणे बदलतील, असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. “तुम्ही ६७ काय घेऊन बसलात, आम्ही याक्षणी ११५ जागा जिंकत आहोत.”