Campaign Rallies of Hindutva leaders: ठाकरे बंधूंना शह देण्यासाठी भाजपची नवी खेळी; मराठी विरुद्ध हिंदुत्व; हिंदी भाषिकांवर भाजपची नजर
देशात सध्या हिंदुत्त्वाची मोठी लाट आहे. याचाच फायदा घेत मुंबई आणि मुंबईला लागून असलेल्या काही उमेदवारांकडून हिंदुत्त्ववादी नेत्यांच्या प्रचारसभांची मागणी होत आहे. या उमेदवारांनी उत्तर भारतातील काही हिंदुत्त्ववादी नेत्यांच्या सभा घेण्यासाठी पक्षनेतृत्त्वाकडे फिल्डिंगही लावल्याची माहिती आहे. ठाकरे बंधुंच्या मराठी विरूद्ध अमराठीला उत्तर देण्यासाठी ‘हिंदुत्त्वा’चा उतारा म्हणून महायुतीकडून हालाचाली सुरू झाल्या आहेत. मुंबईतील हिंदी भाषिकांना, उत्तर भारतातील मतदारांना आकर्षित करण्यााठी हिंदुत्त्ववादी नेत्यांच्या प्रचारसभा होणार असल्याची चर्चा आहे.
मराठी आणि हिंदी भाषिक मतदारांसह नवमतदारांमध्ये हिंदुत्त्वाचे वातावरण आहे. या मतदारांना आकर्षित करण्यासाठी मुंबईत युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवकल्याण आणि राज्यातले मंत्री नितेश राणे आणि गोपीचंद पडळकर यांच्या सभांची जोरदार मागणी होत आहे. उत्तर भारती नेत्यांकडून हिंदुत्त्ववादी नेत्यांच्या सभांची मागणी होत आहे. त्यामुळे मुंबईत येत्या काही दिवसात परप्रांतीय हिंदी भाषिक हिंदुत्त्ववादी नेते प्रचार करताना दिसू शकतात.
मुंबईसह वसई-विरार, मिरा-भाईंदर–भिवंडी, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे–पिंपरी चिंचवड, अहिल्यानगर आणि सोलापूर महापालिकांतील भाजप-शिवसेना (महायुती) उमेदवारांनी मंत्री नितेश राणे यांच्या प्रचारसभांची मागणी केल्याची माहिती समोर येत आहे. उमेदवार यासाठी आग्रही असून, लोकसभा-विधानसभा निवडणुकांप्रमाणेच महायुतीचा ‘बटेंगे तो कटेंगे’ हाच प्रचार पॅटर्न राहणार असल्याचे संकेत आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मागील काही दिवसांत आपल्या भाषणांत हिंदुत्वाबाबत कोणताही तडजोड केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून अल्पसंख्यांक समाजाला सोबत घेण्याची तयारी सुरू असून छत्रपती संभाजीनगरमध्ये रशीद मामू यांना सोबत घेण्यात आले आहे. मुंबईतही यापूर्वी अशाच प्रकारचा प्रयोग करण्यात आला होता.
धक्कादायक बाब म्हणजे, मुंबईत शिवसेना भवनासमोर उत्तर भारतीय सेनेने पुन्हा एकदा वादग्रस्त बॅनर लावला आहे. “उत्तर भारतीय सटोगे तो बचोगे के वरना बाटोगे तो पिटोगे” असा मजकूर या बॅनर्सवर लिहीण्यात आला आहे. मनसे आणि हिंदी भाषिकांमधील वाद हा नेहमी चर्चेचा विषय राहिला आहे. त्यामुळे या बॅनर्सच्या माध्यमातून मनसे नेते संदिप देशपांडे यांना प्रत्युत्तर दिल्याचे बोलले जात आहे. संदीप देशपांडे यांनी, “मराठीचा अपमान कराल तो नहीं बटोगे तो भी पिटोगे.” असा खुला इशारा दिला होता. या प्रत्युत्तर म्हणून हा बॅनर लावल्याची चर्चा आहे. पण या बॅनर्समुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीत वाद उफाळण्याची शक्यता आहे.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, असा दावा उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी केला आहे. उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री गोविंद पंत हे मराठी असू शकतात, तर मुंबईचा महापौर उत्तर भारतीय का असू शकत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सुनील शुक्ला यांनी मनसेवर टीका करत सध्या उत्तर भारतीयांविरोधात ‘नेट प्रॅक्टिस’ सुरू असून, मनसे सत्तेत आल्यास ‘सीझन क्रिकेट’ सुरू होईल, असा आरोप केला. तसेच देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात उत्तर भारतीयांवर मारहाणीच्या घटना घडत असल्याचा दावाही त्यांनी केला.
दरम्यान, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी “नहीं बटोगे तो भी पीटोगे” असे वक्तव्य करत आम्ही सत्तेत येत आहोत, कोणाची भीती नाही, असे म्हटले आहे. उत्तर भारतीय विकास सेना महानगरपालिका निवडणुकीत १०० मराठ्यांना तिकिटे देणार असल्याची घोषणाही सुनील शुक्ला यांनी केली आहे.






