
BJP Ashish Shelar taunted Uddhav Thackeray with a special poem maharashtra news (1)
Maharashtra News : मुंबई : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होत आहे. येत्या रविवारी नगर पंचायत आणि नगर परिषदांचे निकाल हाती येणार आहे. तर महापालिकेच्या निवडणूका जाहीर करण्यात आल्या आहेत. यामुळे सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहे. देशाची अर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर वर्चस्व मिळवण्यासाठी राजकीय पक्ष तयारी करत आहेत. मुंबईमध्ये 25 वर्षांची सत्ता राखण्यासाठी ठाकरे गटाने मनसे पक्षासोबत युतीचा घाट घातला आहे. तर कॉंग्रेसने ठाकरे गटाला पाठ दाखवत स्वबळाचा नारा दिला. त्याचबरोबर महायुतीतून मुंबईसाठी राष्ट्रवादीला बाहेर ठेवण्यात आले. या राजकीय समीकरणावरुन आता भाजप नेते आणि माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक घडामोडी मंत्री आशिष शेलार यांनी टीका केली आहे.
भाजप नेते आशिष शेलार यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कविता पोस्ट करुन शिवसेना ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. आशिष शेलार यांनी मनसे आणि शिवसेनेच्या या युतीवर देखील टीकास्त्र डागले. आशिष शेलार यांनी लिहिले आहे की,
स्वतः केलेली कामे दुर्बीण लावून स्वतःच शोधत आहेत
घरोघरी जाऊन पॉकेट बुक वाटत आहेत
“करुन दाखवलं” चे गाताय जर गाणे,
पॉकेट बुक मध्ये कशाला लावली मग द्वेषाची पाने?
अंगात नाही बळ तरी काँग्रेसची स्वबळाची भाषा
तथाकथित मर्दांच्या पक्षाला मात्र
मनसेच्या पांगुळ गाड्याची आशा
मारली लाथ काँग्रेसने जोराची
आता उभे राष्ट्रवादी(शप) च्या दारात पसरुन पदर
म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर
यांनी काय केले..
सजवली याकूब मेमनची कबर
ज्यांच्या जगण्यात उरला नाही भगवान राम
काय करणार हे मुंबईकरांसाठी काम ?
अशी कविता भाजप नेते आशिष शेलार यांनी लिहिली आहे. ठाकरे गटाकडून देखील भाजपच्या या टीकेला उत्तर देण्यात आले आहे. आशिष शेलार यांच्या कवितेला शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी कवितेतून प्रत्युत्तर दिले आहे.
हे देखील वाचा : पुणेकरांची काढली लाज! परदेशी पाहुण्यांनी फुटपाथवरुन उतरवल्या गाड्या अन् शिकवले नियम, Video Viral
काय आहे अंबादास दानवे यांची पोस्ट?
दुसऱ्याच्या कामावर आयत्या रेघोट्या मारत आहेत,
उद्योजकांच्या दलालीची दुकाने मुंबईत थाटत आहेत..
‘करून दाखवलं’ या शब्दाने तुम्हाला लागलाय अंगार,
ठाकरेंच्या भीतीपोटी करतायेत नकलीपणाचा शृंगार..
मुंबईचा पैसे उडवून तरी मुंबईकर मतांची आशा,
राज्य कर्जबाजारी करणारे करताहेत मुंबई वाचवण्याची भाषा..
हिंदी भाषा लादणारे ओढून बसलेत मराठीची चादर,
आता हे ढोंगी शिकवणार ठाकरेंना हिंदुत्वाचा गजर..
सिकंदर बख्त, आरिफ बेग ज्यांचे संस्थापक नेते,
अधून मधून देशभक्तीचे सर्टिफिकेट वाटण्याचे खाज त्यांना येते..
हे देखील वाचा : ‘…ही निवडणूक दोन्ही ठाकरेंच्या अस्तित्वाची लढाई, जी 16 तारखेला संपणार’; किरीट सोमय्या यांचं मोठं विधान
अशी घणाघाती टीका अंबादास दानवे यांनी केली आहे. तसेच आशिष शेलार आणि अंबादास दानवे यांच्यामध्ये कवितेमधून वाद निर्माण झाला आहे.