BJP leaders attacked Rahul Gandhi for not having darshan of Ambabai Devi of Kolhapur
कोल्हापूर : कॉंग्रेस नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे महाराष्ट्र दौऱ्यावर होते. त्यांनी कोल्हापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले. तसेच उपस्थितांशी संवाद साधला. याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील मुंबई दौऱ्यावर होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ नेत्यांचे महाराष्ट्र दौरे वाढले आहेत. यानंतर आता भाजप नेत्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी नवरात्रीमध्ये कोल्हापूरमध्ये येऊन अंबाबाईचे दर्शन न घेतल्यामे भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी राहुल गांधींवर जहरी टीका केली आहे. वैयक्तिक पातळीवर टीका करत तुषार भोसले यांनी निशाणा साधला आहे.
कोल्हापूरमध्ये राहुल गांधी यांनी दौरा करुन अंबाबाईचे दर्शन न घेतल्यामुळे भाजप आक्रमक झाले आहे. भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, काँग्रेस पार्टी हिंदुद्वेषी पार्टी आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे काल राहुल गांधी ऐन नवरात्रीत कोल्हापूरला येऊन सुद्धा अंबाबाईच्या दर्शनाला गेले नाहीत. याचे कारण त्यांच्या ख्रिश्चन आईने बिंबवलेले ख्रिश्चन संस्कार तर दुसरीकडे लोकसभेला एकगठ्ठा मिळालेली मुसलमानांची मते गमावण्याची भीती आहे. महाराष्ट्रातल्या सजग हिंदूंनी काँग्रेस पार्टीचा हा हिंदू विरोधी चेहरा ओळखला पाहिजे आणि त्यांना महाराष्ट्रातून हद्दपार केले पाहिजे, अशी गंभीर टीका तुषार भोसले यांनी केली आहे.
हे देखील वाचा : चला शिवस्मारक शोधायला…; संभाजीराजे छत्रपती भाजपविरोधी आंदोलनासाठी मुंबईकडे रवाना
तुषार भोसले यांनी राहुल गांधींवर जहरी टीका केल्यामुळे आता महाविकास आघाडीचे नेते देखील आक्रमक झाले आहेत. कॉंग्रेस नेत्यांकडून या टीकेला काय प्रत्युत्तर येणार याची चर्चा सुरु आहे. राहुल गांधी यांनी देखील कोल्हापूर दौऱ्यावेळी भाजपवर टीका केली. आरक्षण, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि संविधान अशा अनेक विषयांवरुन त्यांनी सत्ताधारी भाजप पक्षाला घेरले. या देशात कोणावरही अन्याय होता कामा नये. त्याच विचारांचं प्रतिबिंब आज आपल्याला संविधानात दिसून येत आहे. संविधानात अशी एकही तरतूद नाही, जी शिवाजी महाराजांच्या विचारातून आलेली नाही. त्यांच्या विचारातून संविधानाची निर्मिती झाली आहे. शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांसारखी लोक जन्माला आली नसती, तर आपलं संविधानही नसतं. ज्यावेळी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होणार होता, तेव्हा भाजपाच्या विचारधारेच्या लोकांनी त्यांचा राज्याभिषेक होऊ नये, यासाठी प्रयत्न केले होते. त्यामुळे आज सुरु असलेली विचारधारेची लढाई ही खूप जुनी आहे. ज्याप्रकारे या लोकांनी शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाला विरोध केला, त्याप्रमाणे आताच्या सत्ताधाऱ्यांनी संसदेच्या उद्घाटनाला आदिवासी राष्ट्रपती असलेल्या द्रौपदी मुर्मू यांना बोलवलं नाही, असा घणाघात राहुल गांधी यांनी कोल्हापूर दौऱ्यावेळी केला.