पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलपूजन केल्यानंतर अद्याप अरबी समुद्रामध्ये शिवस्मारक न उभारण्यात आल्यामुळे संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले आहेत. (फोटो - टीम नवराष्ट्र)
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण रंगले आहे. महायुती, महाविकास आघाडी यांच्यासह तिसरी आघाडी देखील ॲ क्शनमोडमध्ये आली आहे. संभाजीराजे छत्रपती यांचा नवीन महाराष्ट्र स्वराज्य पक्ष राजकारणाच्या मैदानामध्ये उतरला आहे. या पक्षाने पहिल्याच आंदोलनामध्ये भाजपला लक्ष्य केले आहे. संभाजीराजे छत्रपती हे यांनी चला शिवस्मारक शोधायला हे आंदोलन छेडले आहे. या अंतर्गत अरबी समुद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिवस्मारकाचे हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र अद्याप हे शिवस्मारक उभारण्यात आलेले नाही. यावरुन आक्रमक भूमिका घेत चला शिवस्मारक शोधायला आंदोलन सुरु केले आहे. यासाठी संभाजीराजे छत्रपती हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र अद्याप कोणत्याही प्रकारचे काम सुरु करण्यात आलेले नाही. याविरोधात संभाजीराजे छत्रपती यांनी आवाज उठवला. याच पार्श्वभूमीवर चला शिवस्मारक शोधायला हे आंदोलन आज संभाजी राजे यांच्याकडून करण्यात येणार आहे. संभाजी राजे पुण्यातून मुंबईकडे रवाना झाले आहेत. त्यासाठी संभाजी राजे पुण्यातील स्वराज्य भवन येथून मुंबईकडे रवाना झालेत. यावेळी अरबी समुद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या ठिकाणी ते पाहणी करणार आहेत. अरबी समुद्रामध्ये शिवाजी महाराजांचा स्मारक उभारले जाणार होतं त्याचा उपयोग फक्त राजकारणासाठीच असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
हे देखील वाचा : विधानसभेआधी बच्चू कडूंना मोठा फटका; आमदार धनुष्णबाण हाती घेण्याच्या तयारीमध्ये
सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, मुंबईच्या अरबी समुद्रात जगातील सर्वात उंच असे जागतिक दर्जाचे भव्य शिवस्मारक साकारू, अशी स्वप्ने शिवप्रेमी जनतेला दाखवत मागील तीन दशकांत राज्यात अनेक सरकारे आली आणि गेली. २४ डिसेंबर २०१६ रोजी भाजप – शिवसेना प्रणित महायुती सरकारने अत्यंत भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अरबी समुद्रात शिवस्मारकाचे जलपूजन केले. स्मारकाच्या कामांस सुरुवात झाल्याच्या अनेक बातम्या आल्या. शासनाच्या रेकॉर्डवर या स्मारकासाठी कोट्यवधी रुपये खर्च देखील झाले आहेत. येत्या काही दिवसांत या जलपूजन कार्यक्रमास आठ वर्षे पूर्ण होतील, मात्र अरबी समुद्रातील हे शिवस्मारक अद्यापही कुठे दिसत नाही… चला तर मग, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जलपूजन केलेले अरबी समुद्रातील शिवस्मारक शोधूया, अशा शब्दांत संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.