BJP media department chief Navnath Ban targets MP Sanjay Raut over Vice Presidential election 2025
पुणे : दिल्लीमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. उद्या (दि.09) उपराष्ट्रपती पदासाठी मतदान होणार आहे. यावरुन राज्यामध्ये देखील राजकारण रंगले आहे. एनडीएकडून आणि इंडिया आघाडीकडून विजयाचा दावा केला जात आहे. यावर भापन नेत्यांनी विजय एनडीएचे उमेदवार सी पी राधाकृष्णन विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर देखील टीका केली आहे.
नवनाथ बन म्हणाले की, “उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा विजय होणार असून युपीएच्या ठिकऱ्या उडणार आहेत. युपीएतील खासदारसुद्धा आता राहुल गांधींच्या अपरिपक्व राजकारणाला कंटाळले असून क्रॉस व्होटिंगचा युपीएला धोका आहे. सर्वाधिक सावध रहाण्याची गरज युपीए आणि राहुल गांधी यांना आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी राहुल गांधी यांना सावधगीरीचा सल्ला द्यावा” अशी खोचक टीका भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी केली.
नवनाथ बन यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांटच्यावर टीकास्त्र डागले आहे. भारतीय जनता पार्टीने यावेळी मुहूर्त न काढता उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक पितृपक्षात घेतल्यामुळे भाजपा हा सेक्युलर झाला अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. याचा नवनाथ बन यांनी खरपूस समाचार घेतला आहे. ते म्हणाले की, “वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्या उद्धव ठाकरे, संजय राऊतांनी भाजपाला शहाणपण शिकवू नये. बाळासाहेबांचे शेवटच्या दिवसांत कसे हाल केले गेले याबाबत खुद्द राज ठाकरे यांनीच सांगितलं आहे. ज्यांनी आपल्या वडिलांना अशी वागणूक दिली, ज्यांनी त्यांचे कार्यकर्ते सोडून दिले त्यांना दुसऱ्याचा बाप काढण्याचा अधिकार नाही. भाजपासाठी 365 दिवस पवित्र असल्याने आम्हाला निवडणुकीचा मुहूर्त काढावा लागत नाही. पितृपक्ष असल्याने निवडणूक घेऊ नये, हा संजय राऊत यांचा केवळ बहाणा आहे. खरं म्हणजे ते घाबरले असून निवडणुकीपासून पळ काढत आहेत,” अशी टीका बन यांनी केली.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “मुंबई महापालिका निवडणुकीत मविआचा नव्हे तर महायुतीचा महापौर होणार आहे. संजय राऊत यांनी दिवसा स्वप्न पाहणं थांबवावे. आज खरी शिवसेना भाजपासोबत आहे. आगामी महापालिका निवडणुकाही आम्ही मराठी माणसाच्या आणि सर्वसामान्यांच्या ताकदीवर जिंकणार आहोत,” असा विश्वास नवनाथ बन यांनी व्यक्त केला.
त्याचबरोबर खासदार संजय राऊत यांनी लालबागच्या राजाला दर्शनाला जात नसल्याचे देखील सांगितले. याबाबत नवनाथ बन म्हणाले की, “गणेशोत्सव हा हिंदूंचा आहे. लालबागचा राजा संजय राऊत यांना पावणार नाही कारण राऊतांना गणेशोत्सवापेक्षा अफजलखानाची कबर जास्त प्रिय वाटते. संपूर्ण महाराष्ट्र आनंदाने गणेशोत्सव साजरा करतो पण तुम्हाला नेमके तेच खुपते. गणेशोत्सवाला जात नाही असं कितीही राऊत यांनी सांगितलं तरी महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक तो मोठ्या उत्साहात साजरा करतो,” असा टोला त्यांनी लगावला आहे.
राऊत यांच्या बुद्धीचं विसर्जन झालं
त्याचबरोबर नवनाथ बन म्हणाले की, “सामना वर्तमानपत्रात मुख्यमंत्र्यांच्या जाहिराती आल्या नाहीत म्हणून राऊत यांचे पोट दुखतंय. सामना कदाचित काळ्या कर्मांवर चालत असेल, पण भाजपाचा कारभार स्वच्छ, पारदर्शी आहे. देवेंद्र फडणवीसांवर असलेल्या मराठी माणसाच्या आणि मतदारांच्या प्रेमातूनच आमच्या जाहिराती येतात. राऊत यांनी भाजपाच्या जाहिरातींवर 50 कोटी खर्च झाल्याचा आरोप केला. त्यावर नवनाथ बन यांनी पलटवार करत संजय राऊत यांच्या बुद्धीचं विसर्जन झालं आहे अशी जोरदार टीका त्यांनी केली. 50 कोटी रुपयांचा खर्च लोकसभा निवडणुकीत देखील होत नाही हे स्पष्ट करत उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला येणाऱ्या जाहिराती कोणत्या पैशातून येतात हे त्यांनी एकदा जाहीर करावं,” असे आव्हान त्यांनी दिलं.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
रोहित पवारांची पळताभुई थोडी अशी दयनीय स्थिती
रोहित पवारांवर निशाणा साधत बन म्हणाले की, “प्रदेशाध्यक्ष होण्याचे स्वप्न भंगले आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिल्यामुळे रोहित यांची पळताभुई थोडी झाली असून त्यामुळे आलेल्या हताशेतून रोहित पवार रोज बिनबुडाचे आरोप करत आहेत. शरद पवार रोहित यांना कधीच प्रदेशाध्यक्ष करणार नाहीत याची जाणीवही त्यांनी रोहित यांना करून दिली. मराठा बांधव आजही फडणवीस यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहेत हे सत्य रोहित यांनी स्विकारावे असाही सल्ला नवनाथ बन यांनी दिला.