
निवडणुकीत महायुती होणार की स्वबळावर?
हौसे नवशे कार्यकर्ते, पदाधिकारी इच्छुक
उमेदवारीसाठी चढाओढ; बंडखोरीची शक्यता
प्रकाश वराडकर/रत्नागिरी: राज्यात नगरपरिषद व नगरपंचायती यांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. स्थानिक स्तरावरील ही निवडणूक असल्याने या निवडणुकीत विधानसभेप्रमाणेच शिवसेना-भाजपा व मित्र पक्षांची महायुती होणार की नाही? असे प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. त्यातच राज्यातील अनेक जिल्ह्यात महायुतीतील घटक पक्ष स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या येत आहेत. कोकणातही असेच काहीसे वातावरण निर्माण झालेले दिसून येत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना भाजपा व मित्र पक्ष हे महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढविणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र महायुतीच्या घटक पक्षांमध्ये स्वबळाचा नारा दिला जात आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही रत्नागिरीत महायुतीच्या माध्यमातून तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वबळावर निवडणूक लढविण्याबाबत भाष्य केले आहे. त्यामुळे स्थानिक स्तरावर कार्यकर्त्यांची नाराजी राहू नये आणि बंडखोरी वाढू नये या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वबळाचा मुद्दा अधोरेखित झाला आहे. त्यामुळे खरोखरच सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपा, शिवसेना आणि मित्र पक्ष हे स्वबळावर निवडणूक लढविणार का, याची चर्चा होत आहे.
उमेदवारीसाठी चढाओढ; बंडखोरीची शक्यता
रत्नागिरी जिल्ह्यातही स्थानिक पातळीवरील या निवडणुकांकरिता अनेक हौसे नवशे कार्यकर्ते, पदाधिकारी हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातही इच्छुकांची गर्दी वाढली आणि रोष निर्माण झाला तर महायुतीच्या माध्यमातून संपूर्णतः जिल्ह्याची निवडणूक होईल का, असा प्रश्नही निर्माण झाला आहे. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या तुलनेत रत्नागिरी जिल्ह्यात महायुती अनेक ठिकाणी निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. इच्छुकांना समजावून महायुतीच्या माध्यमातून निवडणूक होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी नगरपरिषद राजापूर नगरपरिषद चिपळूण नगर परिषद खेड नगरपरिषद आणि गुहागर नगरपंचायत यासाठी निवडणूक होणार आहे.
मोठी बातमी! निवडणुकीआधी Mahayuti तुटणार? शिवसेनेसोबत युती करण्यास ‘या’ पक्षाचा तीव्र विरोध
कोणाला उमेदवारी द्यावी याबाबतचे प्रश्नचिन्ह
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढविल्यास महायुती मधील घटक पक्षामध्ये असलेली उमेदवारीसाठी ची चढाओढ पाहता मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवरच पक्षात फाटा फूट होऊ नये यासाठी महायुती म्हणून न लढता स्वतंत्रपणे मैत्रीपूर्ण लढत देण्याबाबत भाजपाने संकेत दिले आहेत. शिंदे शिवसेनेकडून याबाबत अद्याप घोषणा झालेली नसली तरी रत्नागिरीचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे नेते उदय सामंत हे ८ नोव्हेंबरला सिंधुदुर्ग जिल्ह्यात जात असून तेथे शिवसेना नेत्यांची, कार्यकत्यांची बैठक याबाबत घेतली जाणार आहे. त्यावेळेस महायुती की स्वबळावर याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे. काही वर्षांच्या विलंबानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत त्यात सर्वप्रथम नगरपरिषद नगरपंचायत यांच्या निवडणुका दोन डिसेंबरला होत आहेत.
Maharashtra Politics: कोकणातल्या ‘या’ नगरपंचायतीसाठी कांटे की टक्कर! MVA विरुद्ध महायुती भिडणार
त्यामुळे इच्छुक असलेल्यांची संख्या मोठी आहे. प्रत्येक पक्षातच उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांची भाऊ गर्दी आहे, त्यामुळे पक्ष नेतृत्व समोर कोणाला उमेदवारी द्यावी याबाबतचे प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. या स्थितीत जर महायुती किवा आघाडी अशी निवडणूक लढवली गेली तर अनेकांना संधी मिळणार नाही, त्यामुळे बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढविणा-यांची संख्या वाढू शकते, त्याचा त्रास पक्षीय अधिकृत उमेदवारांना होऊ शकतो. सर्वच पक्ष या निवडणुकीच्या वेळी संभाव्य बंडखोरी बाबत धास्तावलेले दिसून येत आहेत परिणामी स्वबळाचा नारा पुढे येत आहे याचे चित्र येत्या दोन दिवसात स्पष्ट होणार आहे.