BJP's Bhaskar Rao praises Rakesh Kishor, who attacked Chief Justice Bhushan Gavai
BJP leader praises Rakesh Kishor : कर्नाटक : सरन्यायाधीश बी. आर. गवई (Bhushan Gawai) यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयात वकील राकेश किशोर यांनी हा बूट फेकल्याचे समोर आले आहे. सुरक्षा रक्षकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी वकिलांना बाहेर काढले. या प्रकरणाची संपूर्ण देशामध्ये जोरदार चर्चा सुरु असून तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे वकील राकेश किशोर यांनी केलेल्या कृत्याबाबत कोणताही पश्चात्ताप नसल्याचे सांगितले आहे. या प्रकरणावर भाजप (BJP) नेत्याने प्रतिक्रिया दिली असून त्यांनी हल्लेखोराचे कौतुक केले आहे.
सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी कर्नाटक भाजप नेते आणि बंगळूरचे माजी पोलीस आयुक्त भास्कर राव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भास्कर राव यांनी हल्लेखोर वकील राकेश किशोर यांचे कौतुक केले. त्यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. वकील राकेश किशोर यांच्या सोशल मीडिया पोस्टवर भास्कर राव यांनी रिप्लाय दिला आहे. त्यांनी लिहिले आहे की, हा प्रकार कायदेशीरदृश्या चुकीचा आणि भयंकर आहे. तरी तुम्ही या वयातही परिणामांची पर्वा न करता भूमिका घेण्याचे आणि त्यानुसार वागण्याच्या तुमच्या धाडसाचे मला कौतुक आहे, अशा शब्दांत भाजप नेते भास्कर राव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावरुन राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
भाजप नेते भास्कर राव यांनी बी. आर. गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकील राकेश किशोर यांचे कौतुक केल्याने त्यांच्यावर चौफेर टीका केली जात आहे. कॉंग्रेसकडून भाजप नेते भास्कर राव यांचा खरपूस समाचार घेण्यात आला आहे. कॉंग्रेस नेते मन्सूर खान यांनी भाजप नेते भास्कर राव यांच्यावर टीकास्त्र डागले आहे. “हा प्रकार कापदेशीरदृष्या चुकीचा आणि भयंकर आहे, तरी तुम्ही त्याच्या धाडसाचे कौतुक करता? माजी आयपीएस अधिका-याने अशा प्रकारे बोलणे लज्जास्पद आहे. तुम्ही एकेकाळी कायद्याचे रक्षणा केले आहे. आता तुम्ही अशा व्यक्तीच्या बाजूने उभे आहात, ज्याने भारताच्या सरन्यायाधीशांचा अपमान केला. हे किती मोठे पतन आहे” अशा शब्दांत कॉंग्रेस नेत्यांनी जोरदार टीका केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सरन्यायाधीश भूषण गवईं यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा त्यांची बहिण कीर्ती गवई यांनी निषेध केला आहे. त्या म्हणाल्या की, “कालची घटना देशावर कलंक असलेली आणि अतिशय निंदनीय आहे. हा केवळ एक वैयक्तिक हल्ला नाही, तर एक विषारी विचारसरणी आहे. याला रोखणे आवश्यक आहे. असंवैधानिक वर्तन करणाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे.. बाबासाहेबांच्या विचारांना धक्का पोहोचू नये म्हणून आपण आपला निषेध संवैधानिक पातळीवर आणि शांततापूर्ण पद्धतीने नोंदवला पाहिजे.” अशा शब्दांत किर्ती भूषण यांनी नाराजी व्यक्त केली आहे.