'चिन्ह गोठवलं तरी आम्हाला चालेल, पण...'; ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांचं मोठं विधान
मुंबई : शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हे सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडे आहे. या निवडणूक चिन्हावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष आग्रही आहे. याप्रकरणी गेल्या दोन वर्षांपासून हे प्रकरण प्रलंबित आहे. धनुष्यबाण या निवडणूक चिन्हासंबंधी अंतिम सुनावणी आज सर्वोच्च न्यायालात पार पडणार आहे. त्यामुळे या सुनावणीत कोणाचा विजय होणार याची उत्सुकता वाढली आहे. त्यातच खासदार अरविंद सावंत यांनी मोठं विधान केलं आहे.
अरविंद सावंत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘न्यायाधीशांचे नाव सूर्यकांत आहे. किमान सूर्याचा तरी प्रकाश पडू द्या. आशेचा झारोका तुमच्या खिडकीमधून येऊन असं दाखवा. संविधानातील तरतुदीनुसार नियमानुसार कायद्यानुसार व्हावा. तो न्याय हक्क आम्हाला मिळावा तो हक्क आहे. न्यायालयाने न्याय दिला पाहिजे. चिन्ह गोठवलं तरी आम्हाला चालेल. खरंतर चिन्ह तेव्हाच गोठावायला पाहिजे होतं. चिन्ह माझ्या बापाचं नाव तुम्ही दुसऱ्याला देणार का? आम्हाला चिन्ह आणि नावं दोन्ही मिळालं पाहिजे. चिन्ह आणि नाव आमचं आहे. जे सोडून गेलेत ते घर सोडून गेले आहेत’.
हेदेखील वाचा : Thackeray-Shinde Dispute: एकनाथ शिंदे….; शिवसेना पक्षचिन्हाच्या अंतिम सुनावणीपूर्वीच असीम सरोदेंचे गंभीर आरोप
तसेच मुख्यमंत्री होतात, कारभार केला, लाज वाटली पाहिजे. सबंध इतिहासाला काळीमा फासणारी घटना घडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाची धजिया उडवत आहेत. सत्ताधारी लोकांचे खायचे दात वेगळे व दाखवायचे दात वेगळे आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.
ठाकरेंच्या याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी
ठाकरेंच्या शिवसेनेने दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शिवसेना पक्ष आणि पक्षाच्या चिन्हाबाबतच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली होती. यासंबंधी आज (ता. ८) सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. मात्र, सुनावणी होण्यापूर्वीच ठाकरेंच्या शिवसेनेची बाजू मांडणारे वकील असीम सरोदे यांनी एक्सवर पोस्ट करून मोठा प्रश्न उपस्थित केला आहे.
हेदेखील वाचा : River Linking Project: ५ वर्षांत मराठवाडाचा दुष्काळ संपणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची नदीजोड प्रकल्पाची मोठी घोषणा