
भाजपचे धोरण ठरले ! लक्ष दोन राष्ट्रवादी काँग्रेसकडे
पुणे / दीपक मुनोत : महापालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या. आपोआपच राजकीय हालचालींना गती आली. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. तरी, पुण्याचे राजकीय चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
महापालिका निवडणुका व्हाव्यात म्हणून गेली पावणेचार वर्षे इच्छुक उमेदवार वाट पहात होते. प्रभाग रचना, त्यानंतर आरक्षण अशा प्रक्रियेतून इच्छुकांना जावे लागले. आता उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची जोरदार खटपट चालली आहे. ओबीसी आरक्षण, महिला आरक्षण लक्षात घेऊन काही इच्छुकांनी आपल्या पत्नीला, वहिनीला, सुनांना निवडणूक लढविण्यासाठी उद्युक्त केले आहे. एकीकडे ही धडपड चालू आहे अन् दुसरीकडे उमेदवारी मिळण्याबाबत धाकधूकही आहेच.
भारतीय जनता पक्षाचे सर्वेसर्वा मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुणे दौरा नुकताच झाला. या दौऱ्यात त्यांनी भाजपची राजकीय भूमिका स्पष्ट केली. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर भाजपची युती होणार नाही, असं स्पष्ट केले. याचा अर्थ माजी मुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी आणि रिपब्लिकन पक्ष आठवले गटाशी भाजप काही प्रमाणात जागा वाटप करेल. या जागा वाटपात कोणत्या जागा जात आहेत? याकडे भाजपमधील इच्छुकांचे लक्ष आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे वाढली इच्छुकांची गर्दी
अजित पवार यांच्या पक्षाशी भाजपची युती होणार नाही हे समजल्यावर उपनगरांमधील भाजपच्या इच्छुकांना हायसे वाटले आहे. पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी आता त्यांच्या हालचाली चालू झालेल्या आहेत. त्याचवेळी बातम्या अशा आहेत की, अजित पवार यांच्या पक्षाकडे कालपासून इच्छुकांची गर्दी वाढली आहे.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावेत यासाठी इच्छुकांचे प्रयत्न
ज्येष्ठ नेते शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष निवडणुकीत एकत्र यावेत, असा प्रयत्न इच्छुक उमेदवार आणि नेते करीत आहेत. दोन्ही पवारांनी याबाबत अद्याप स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. कार्यकर्ते गोंधळलेले असल्याने येत्या एक, दोन दिवसांतच पवारांना भूमिका स्पष्ट करावी लागेल. काँग्रेस पक्ष या घडामोडींकडे बारकाईने नजर ठेवून आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू निवडणुकीपूर्वी एकत्र येणार याची ग्वाही खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. पण, राज ठाकरे यांचा आघाडीतील समावेशाला काँग्रेस पक्षाचा विरोध आहे. त्यामुळे त्रांगडे झाले आहे.
पुण्यात महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांची बैठक
पुण्यात काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहरप्रमुख संजय मोरे यांची एकत्रित बैठक काँग्रेस भवनात झाली. बैठकीला मनसेचे पदाधिकारी नव्हते. मात्र, बैठकीच्या आदल्या दिवशी शिवसेना उबाठा आणि मनसे पदाधिकाऱ्यांची एकत्र बैठक झाली, त्यात निवडणुकीचा आढावा घेण्यात आला. भाजप विरोधात सर्वांना एकत्र करा, अशी भूमिका शरद पवार यांच्या पक्षाने मांडली आहे. पण, राज ठाकरे यांच्याबाबतचे आक्षेप काँग्रेस पक्षाने अजून मागे घेतलेले नाहीत. भाजप विरोधकांच्या संबंधांमधील ही गुंतागुंत लवकर मिटली नाही तर हे भाजपच्या पथ्यावर पडणारे आहे.
१२० जागा जिंकण्याचा भाजपचा निर्धार
२०१७ साली झालेल्या निवडणुकीत भाजपने ९२ आणि रिपब्लिकन पक्षाने ५ अशा ९७ जागा भाजप आणि मित्रपक्षाने जिंकल्या होत्या. रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांनी कमळ या चिन्हावरच निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत १२० जागा जिंकण्याचा निर्धार भाजपने केला आहे आणि सगळी व्यूहरचना त्यासाठी पद्धतशीर आखली आहे. निवडून येण्याची क्षमता हा एकमेव निकष ठेवून भारतीय जनता पक्ष उमेदवारी देणार आहे. उमेदवारी देताना कोणतीही जोखीम भारतीय जनता पक्ष पत्करणार नाही.
२०१४ पासून पुण्याच्या राजकारणात भाजपची पकड
२०१४ सालापासून पुण्याच्या राजकारणावर भाजपची पकड आहे. ती पकड कायम ठेवायची, असा प्रयत्न मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आहे. बंडखोरी शमविण्यासाठीचीही आखणी भाजपने केली आहे. कार्यकर्त्यांना देण्यासाठी भाजपकडे खूप काही आहे, असे वक्तव्य भाजपच्या एका नेत्याने केले होते.
हेदेखील वाचा : Manikrao Kokate Resignation: ‘दादां’नी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा स्वीकारला; पक्ष संदर्भात अजित पवारांचा महत्वाचा निर्णय