
जागा वाटपाची चर्चा तुटेपर्यंत ताण देऊ नका; मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा सल्ला
इचलकरंजी : राज्याप्रमाणे इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीत महायुती म्हणूनच एकत्र लढायचे आहे. जागा वाटपासंदर्भात वरिष्ठ आणि स्थानिक पातळीवर चर्चेतून तोडगा काढला जाईल. मित्रपक्षांनीसुद्धा ज्याठिकाणी आपली ताकद आहे, उमेदवार निवडून येऊ शकतील अशाच ठिकाणच्या उमेदवारीची मागणी करावी. जागा वाटपाची चर्चा करताना तुटेपर्यंत ताण देऊ नये यासाठी प्रयत्न सुरु आहेत. जागा वाटपाचा निश्चितपणे योग्य तोडगा काढला जाईल, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा महानगरपालिका निवडणूक भाजपचे प्रभारी शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केला.
इचलकरंजी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी शिवेंद्रराजे भोसले यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवेंद्रराजे भोसले हे इचलकरंजीत आले होते. शहरात आल्यानंतर त्यांनी शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास व त्यानंतर शंभुतीर्थ येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी आमदार राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, मकरंद देशपांडे, राजवर्धन नाईक-निंबाळकर, शेखर शहा, शशिकांत मोहिते, सुनिल पाटील, शहाजी भोसले, सपना भिसे, सीमा कमते, यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
हेदेखील वाचा : काँग्रेसला धक्का ! प्रदेश उपाध्यक्षा प्रज्ञा सातव यांचा आमदारकीचा राजीनामा; भाजपमध्ये केला प्रवेश
त्यानंतर भाजप शहर कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी इचलकरंजी महानगरपालिकेच्या ६५ जागांसाठीच्या निवडणुकीत भाजपकडून तब्बल ४२९ जणांनी उमेदवारीची मागणी केली आहे. इच्छुकांच्या मुलाखती सुरु असून, सक्रीय कार्यकर्त्यांची भाजपमध्ये निश्चितपणे दखल घेतली जाते आणि योग्य वेळी न्यायही दिला जातो. तसेच सर्वांनाच उमेदवारी मिळेल असे नसल्यामुळे ज्यांना उमेदवारी मिळेल, त्यांच्या विजयासाठी बाकीच्यांनी ताकदीने प्रयत्न करावेत.
…अशाच जागांची मागणी करावी
महायुतीतील मित्र पक्षांनी आपली ताकद असेल, उमेदवार निवडून येतील अशाच जागांची मागणी करावी. एकत्र राहून सर्वांना काम करायचे आहे. त्यामुळे चर्चेतून योग्य तो तोडगा काढण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले.
हेदेखील वाचा : ‘मनसे’शी युती म्हणजे उबाठा गटाचा अस्तित्व वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न; भाजपच्या नेत्यांची जिव्हारी लागणारी टीका