
Local Body Election 2025: ऑनलाईनमुळे यंत्रणा ठप्प; मात्र 'या' निर्णयाने राजकीय पक्षांना दिलासा
१७ नोव्हेंबर पर्यंत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत
डिसेंबर महिन्यात लागणार निवडणुकीचा निकाल
भाजपकडे सद्यस्थितीत उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात
सासवड: नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आता अवघे दोनच दिवस शिल्लक आहेत. अर्ज दाखल करण्यास १० नोव्हेंबर पासून प्रारंभ झाला आहे. यापूर्वी केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करण्यात येत होते. परंतु सर्व्हर डाऊन असल्याने कामकाज अत्यंत धीम्या गतीने सुरु होते. निवडणूक अधिकारी मात्र वेळेचे बंधन पाळण्यात व्यस्त होते. मात्र आता निवडणूक आयोगाने अर्ज दाखल करण्यास ऑनलाईन बरोबरच ऑफलाईन पद्धतीचा वापर करण्यास संमती दिल्याने विवंचनेत असलेल्या राजकीय पक्षांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.
१० नोव्हेंबर पासून १७ नोव्हेंबर पर्यंत नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. आता केवळ दोनच दिवस शिल्लक असून रविवारीही अर्ज दाखल करण्याच्या निवडणूक आयोगाने सूचना दिल्या आहेत. त्यामुळे रविवार आणि सोमवार अखेरच्या दिवशी निवडणूक कचेरी मध्ये मोठीं धावपळ पाहण्यास मिळणार आहे. दरम्यान यापूर्वी निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी केवळ ऑनलाईन पद्धतीचा वापर करण्यात येत होता.
मात्र शासनाचा सर्व्हर डाऊनमुळे अत्यंत संथ गतीने कामकाज सुरु होते, परिणामी त्याचा उमेदवारांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास केवळ दोनच दिवस शिल्लक असून त्यामध्ये रविवारी सुटीचा दिवस असल्याने सर्वांचीच मोठी धाकधूक वाढली होती. शासनाची यंत्रणा व्यवस्थित चालत नसल्याने निवडणूक आयोगाने नव्याने आदेश काढून उमेदवारी अर्ज रविवारीही दाखल करतानाच ऑनलाइन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज दाखल करण्यास सूचना केल्या. यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी समाधान व्यक्त केले आहे. त्यामुळे आता सोमवारी शांतपणे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास उमेदवारांना वाव मिळाला आहे.
सासवड नगरपरिषद निवडणूक होणार रंगतदार; संजय जगतापांसमोर असणार ‘हे’ आव्हान
सासवड नगरपरिषद मध्ये आतापर्यंत शिवसेना पक्षाच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी माजी नगरसेवक सचिन भोंगळे यांचा अर्ज दाखल झाला आहे. तसेच भाजप प्रणीत जनमत विकास आघाडीच्या वतीने दत्तात्रय घाटे असे दोन अर्ज दाखल झाले आहेत. त्याचबरोबर शिवसेनेच्या वतीने शिल्पा जगताप, वैभव टकले, अनिता माने, मंगेश भिंताडे, रत्ना म्हेत्रे, माजी नगरसेविका डॉ. अस्मिता पोखार्निकर, सुनील पवार, दिपाली जगताप, सुरज माने आदींनी विविध प्रभागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
भारतीय जनता पार्टीच्या वतीने अर्चना जगताप, दीप्ती सूर्यवंशी, रवी कल्याणकर यांनी अर्ज दाखल केले आहेत. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या वतीने सुप्रिया चेतन महाजन यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला आहेत. तर अपक्ष उमेदवार म्हणून रोहित भोंडे, अतुल पवार, अमृता म्हेत्रे, रेश्मा भोंडे यांनी विविध प्रभागासाठी अर्ज दाखल केले आहेत.
भाजपकडून सोमवारी सर्व अर्ज दाखल होण्याची शक्यता
भाजपकडे सद्यस्थितीत उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात असून त्यातील अनेकजण दुसऱ्या पक्षात जाण्याच्याही तयारीत आहेत. त्यामुळे पक्षातील बंडखोरी टाळून सर्वांची मनधरणी करताना भाजप नेते माजी आमदार संजय जगताप यांना यावेळी प्रथमच तारेवरील कसरत करावी लागत आहे. अधिकृत उमेदवारांची घोषणा आताच केल्यास त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता असून उमेदवारी मिळेल तिकडे कार्यकर्ते जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्षाला त्याचा तोटा होवू नये आणि कोणताही दगा फटका होवू नये याची काळजी घेत नव्या जुन्यांची सांगड घालून संजय जगताप सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी सर्व अर्ज एकाच वेळी शक्ती प्रदर्शनाने दाखल करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
Saswad News: सासवड नगरपरिषदेच्या मनमानी कारभाराला चाप कधी बसणार?
शिवसेना आणि राष्ट्रवादी युतीतून उमेदवार येणार
शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांनी कोणत्याही परिस्थितीत सासवड नगरपरिषदेत सत्ता स्थापन करण्याचा चंग बांधला असून इतर पक्षातून येणाऱ्याला यासाठी प्राधान्य दिले जात आहे. त्याबरोबरच त्यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस ( अजित पवार ) बरोबर युतीची चर्चा सुरु असून रविवारी पर्यंत त्यावर अंतिम तोडगा निघण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे सोमवारी शिवसेना राष्ट्रवादी युतीचे उमेदवार अर्ज दाखल करतील. दरम्यान महाविकास आघाडीने ( राष्ट्रवादी शरद पवार, आम आदमी पार्टी आणि शिवसेना ( उद्धव ठाकरे ) स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याची घोषणा केली असली तरी त्यांच्या गोटातून अद्याप फारशी सकारात्मक माहिती समोर येत नसल्याने त्यांनी कोणासाठी सस्पेन्स ठेवला आहे असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे.