सासवड नगरपरिषद (फोटो- सोशल मीडिया)
सासवड/संभाजी महामुनी: स्वच्छ आणि सुंदर सासवड म्हणून नावलौकिक प्राप्त असलेल्या सासवड नगरपरिषदेतील अधिकाऱ्यांचा भोंगळ आणि मनमानी कारभार नेहमी चर्चेचा विषय ठरला आहे. कोट्यावधी रुपयांचा निधी असूनही मंजूर कामे वेळेत न करता ठेकेदारांच्या सोयीनुसार जनतेला वेठीस धरणे, नागरिकांचे प्रश्न गांभीर्याने न घेता टाळाटाळ करणे. यातून अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार वाढत चालला आहे. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाच्या मनमानीला चाफ कधी बसणार ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर सासवडमध्ये फ्लेक्स वॉर मोठ्या प्रमाणात झाले होते. या बाबत सासवडमधील नागरिकांनी लेखी निवेदने देवून प्रशासनाला जाब विचारला होता. याबाबत प्रसार माध्यमांनी जोरदार आवाज उठवल्यानंतर सासवडमधील जवळपास सर्वच होर्डिंग आणि फ्लेक्स काढून कारवाई केली होती. त्यामुळे नागरिकांनी सुस्कारा सोडला होता. तसेच सासवड फ्लेक्स्मुक्त झाल्याचे जाहीर केले होते. मात्र काही दिवसानंतर आता पुन्हा एकदा राजकीय नेत्यांचे वाढदिवस आणि विविध उपक्रमांच्या निमित्ताने सासवडला फ्लेक्स आणि होर्डिंगचा विळखा पडल्याचे दिसत असून प्रशासनाला आपल्याच आदेशांचा विसर पडला आहे का ? असा प्रश्न पडला आहे.
सासवडनगर परिषदेसमोर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा असून समोर डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान आहे. महात्मा फुले यांचाही परिषदेच्या आवारात पुतळा आहे. भारत पाकिस्तानमधील युद्धाची आठवण करून देणारा भव्य रणगाडा समोरच आहे. हा परिसर पाहून रस्त्याने जाणारा प्रत्येक व्यक्ती थांबल्याशिवाय राहत नाही. मात्र प्रशासनाच्या मनमानी पद्धतीमुळे या परिसराला पुन्हा एकदा फ्लेक्सचा विळखा पडला आहे. नगरपरिषद पासून एसटी बस स्थानक पर्यंत संपूर्ण परिसर फ्लेक्स्ने झाकून जात आहे. त्याचबरोबर शहरातील विजेच्या प्रत्येक खांबावर विविध जाहिरातीचे बोर्ड, फ्लेक्स लावले जात असल्याने स्वच्छ, सुंदर शहराचे पुन्हा विदिरुपिकरण झाले आहे. मात्र प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.
रस्त्यावरील खड्डे नित्याचीच बाब ,,,,,,
सासवडमध्ये संत सोपानदेव मंदिर, संगमेश्वर, वटेश्वर, सिद्धेश्वर अशी प्राचीन मंदिरे असून विविध प्रेक्षणीय स्थळे असल्याने दररोज हजारो नागरिक सासवड मधील रस्त्यावरून प्रवास करीत आहेत. मात्र शहरातील रस्त्यावरील पडलेले मोठ मोठे खड्डे हि नित्याची बाब झाली आहे. बाजार पेठेतील रस्ते, विविध मंदिरानाकडे जाणारे रस्ते यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून यावरून कित्येक वाहने पडत आहेत. नागरिकांनी वेळोवेळा तक्रारी करूनही त्याकडे सोयीस्कपणे डोळेझाक केली जात आहे. नागरिकांच्या समाधानासाठी तात्पुरते खड्डे बुजवले जातात मात्र एक पाऊस पडला कि माती वाहून पुन्हा मूळ रस्ते उघडे पडतात. यातून नागरिकांच्या समस्येपेक्षा ठेकेदारांचे हित जोपासले जात आहे असेच दिसून येते.
स्मशान भूमीच्या दुरवस्थेला जबाबदार कोण ?
सासवड शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असून सासवड मधील स्थानिक नागरिकां बरोबरच बाहेरील लोकांची संख्या वाढत आहेत. एवढ्या मोठ्या लोकसंख्येतून अनेक नागरिक मृत्यू होत आहेत. त्याच्या अंत्यविधीसाठी प्रशासनाने सर्व सुविधा युक्त वैकुंठ स्मशानभूमीचे बांधकाम केले आहे. मात्र सध्या या स्मशानभूमीला अवकळा प्राप्त झाली आहे कि काय ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण स्मशानभूमीचे शेड पूर्णपणे जीर्ण झाले असून पावसाळ्यात त्यातून पाणी खाली पडत आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी वेळोवेळा माहिती देवूनही अधिकाऱ्यांचे मात्र कानावर हात अशीच अवस्था आहे.
महिलांसाठी स्वतंत्र शौचालयाची सुविधा नाही.
स्वच्छ, सुंदर सासवडचा संपूर्ण देशात डंका वाजवला जात आहे. सासवड तालुक्याचे ठिकाण असल्याने दररोज येथे हजारो नागरिक येत असतात. येथे पुरुषांसाठी स्वतंत्र सौचालयाची ठिकठिकाणी व्यवस्था आहे. मात्र महिलांसाठी संपूर्ण शहरात अपवाद वगळता कोठेही व्यवस्था नाही. भाजी मंडई आणि एसटी बस स्थानक वगळता अन्य कोठेही सुविधा नाही. परिणामी महिलांची मोठ्या प्रमाणात कुचंबना होते. परंतु याकडे मुख्याधिकारी आणि प्रशासनाने वर्षानुवर्षे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. त्यामुळे महिलांच्या स्वच्छते बाबत प्रशासन गांभीर्याने कधी घेणार ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.