
जिल्हा परिषद सभापतींची आज निवड; पक्षांमध्ये रस्सीखेच; समित्यांची काय रणनीती बनवली जाते याकडे लक्ष
छत्रपती संभाजीनगर : मागील महिन्यात जिल्हा परिषदेच्या ६३ गट, १२६ गणांतील सदस्य निवडणुकीनंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड पार पडली. आता आज विषय समित्यांच्या सभापतींची निवड प्रक्रियेचे आयोजन करण्यात आले आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत मोठे राजकीय नाट्य पाहायला मिळाले. दोन्ही पद भाजपने स्वतःकडे खेचून घेत मित्र पक्षांना घरचा रस्ता दाखवला. आता विषय समित्यांची काय रणनीती बनवली जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.
तब्बल ६ वर्षांनी मिनी मंत्रालयाच्या बहुप्रतीक्षित निवडणुका पार पडल्या. यात महायुतीतीळ भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित लढण्यावर काथ्याकूट झाले. अखेरीस काही ठिकाणी एकत्रित तर काही ठिकाणी स्वबळावर लढत झाली. भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या. तर दुसऱ्या स्थानावर शिंदे गट शिवसेना राहिली. दरम्यान, यानंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत मोठे राजकारण पाहायला मिळाले. महापालिकेत अध्यक्षपद भाजपला गेल्याने झेडपी अध्यक्षपद आमच्याकडे द्यावे असा आग्रह शिंदे गटाचा होता. यावर स्थानिक आणि वरिष्ठ स्तरावर बैठकांचे सत्र झाले.
अखेरीस नाट्यमय घडामोडी घडल्या. शिंदे गटाला बाजूला ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवर गटाला सोबत घेत भाजपने दोन्ही पद स्वतःकडेच ओढून घेत शिवसेनेला घरचा रस्ता दाखवला. यामुळे शिवसेना-भाजपतील अंतर्गत दुफळी समोर आली.
हात उंचावून मतदान
आज होणाऱ्या सभापती निवड प्रक्रियेसाठी ६३ सदस्य आणि ९ पंचायत समिती सभापती याना निमंत्रित करण्यात आले आहे. मात्र, सभापतींना यात मतदान करण्याचा अधिकार राहणार नाही. निवड प्रक्रियेत कोणतीही गडबड गोंधळ होऊ नये यासाठी सर्व प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात येणार आहे. निवडीसाठी हात वर करून मतदान घेतले जाईल.
असा असेल निवड कार्यक्रम…
पिठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कन्नड संतोष गोरड यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही सभा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात २ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता होईल. सकाळी १० वाजल्यापासून प्रक्रियेला सुरुवात होईल. सकाळी १० ते १२ या वेळात नामनिर्देशन स्विकारणे तर दुपारी २ वाजता विशेष सभेस सुरुवात होईल. प्रथम प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी, त्यानंतर नामनिर्देशन माघारीसाठी वेळ दिला जाईल. त्यानंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी मराठी वर्णक्रमानुसार करण्यात येईल. त्यानंतर समिती सभापती निवडणूकीसाठी एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास हात वर करुन मतदान घेण्यात येईल. हात वर करुन मतदान करणाऱ्या सदस्याची स्वाक्षरी घेऊन नोंद घेण्यात येईल. सभेसाठी ६३ जिल्हा परिषद सदस्य व ९ पंचायत समिती सभापती यांना बैठकीसाठी बोलावण्यात आले आहे.
Kerala Election : मोफत गॅस सिलेंडर, महिलांसाठी बेस कार्ड अन् ३,००० रुपयांची पेन्शन…! केरळ निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध