
'महाराष्ट्राच्या जनतेला विकासाच्या वाटेवर नेण्याचा प्रयत्न केला'; मुख्यमंत्र्यांचं विधान
मुंबई : महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला प्रचंड मोठा आशीर्वाद दिला होता. आम्हाला २३२ जागा मिळाल्या आणि मी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. याला एक वर्ष पूर्ण झाले. या वर्षभरात आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला विकासाच्या वाटेवर नेण्याचा प्रयत्न केला आहे, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
महायुती सरकारने आपल्या एका वर्षाच्या कार्यकाळाची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली होती. यावर, विरोधकांच्या मनात कायम खदखद असते, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. बहरणावळा ‘मागेल त्याला सौर कृषिपंप योजना’ उपक्रमाला जागतिक विक्रमाचा मान मिळाल्यासाठी ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’चे प्रमाणपत्र प्रदान सोहळा शुक्रवारी शहरातील ऑरिक येथे आयोजित करण्यात आला होता. महायुती सरकारला सत्तेत येऊन शुक्रवारी (दि.५) एक वर्ष पूर्ण झाले. या एका वर्षात सरकार आपली पाठ थोपटून घेत आहे.
पंचतारांकित हॉटेलमध्ये बसून सरकार आपली उपलब्धी सांगत असले तरी जनतेच्या पदरी मात्र निराशाच आली आहे. त्यामुळे राज्य सरकारने अधिवेशनात आपल्या कामाची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी नागपुरात केली होती. याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी प्रत्युत्तर दिले.
सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे खाजगीकरण नाही
राज्यातील सुपर स्पेशालिटी रुग्णालयांचे खाजगीकरण केले जात असल्याची चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्याचे खंडन केले. ते म्हणाले, कुठल्याही सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे खाजगीकरण केले जात नाही. सगळे सुपर स्पेशालिटी रुग्णालये आपण चालवत आहोत. ते कोणालाही दिलेले नाहीत. मात्र, जर याचा विस्तार करायचा असेल तर आपण स्वतंत्र ‘पीपीपी’ची पॉलिसीही आणू शकतो. याचा अर्थ खाजगीकरण करतोय असा होत नाही.
खाजगीकरणाचा मुद्दा फडणवीसांनी काढला खोडून
रुग्णालयात दर्जेदार उपचार सुविधा मिळाल्या पाहिजे, सर्वसामान्य रुग्णाला आरोग्य योजनेंतर्गत उपचार मिळाले पाहिजे, या दोन बाबींकडे लक्ष देणे महत्त्वाचे असल्याचे सांगून खाजगीकरणाचा मुद्दा फडणवीस यांनी खोडून काढला.
विरोधकांच्या मनात खदखद कायम
विरोधकांच्या मनात कायम खदखद असते. महायुती हे करू शकते तर आपण इतके वर्ष सत्तेत राहून का करू शकलो नाही, आपण अशा योजना का आणू शकलो नाही, अशी खदखद या लोकांच्या मनामध्ये कायम असते. आणि ती वेळोवेळी बाहेर पडत असते. त्यामुळे यावर टीका करण्यासारखे काही नसल्याचे सांगून फडणवीस यांनी विषयाला पूर्णविराम दिला.
हेदेखील वाचा : राज्यातील सर्व राजकीय पक्ष देवेंद्र फडणवीस चालवतात; भाजपच्या नेत्याची कबुली, चर्चांना उधाण