Cm Devendra fadnavis on bjp mp nishikant dubey Controversial statement on Marathi people
Devendra fadnavis on Nishikant Dubey : मुंबई : राज्यामध्ये हिंदी विरुद्ध मराठी असा वाद निर्माण झाला आहे. मीरा भाईंदर येथे मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना मोर्चा काढला. या मोर्चाला परवानगी नसताना देखील हा मोर्चा काढण्यात आला. यामध्ये ठिय्या आंदोलन करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की देखील झाली आहे. यामुळे मीरा भाईंदर येथे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून या ठिकाणी 144 कलम लागू करण्यात आले आहे. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी माणसांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन वाद पेटला आहे. भाजपच्या या खासदारच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला असून या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी अकलेचे तारे तोडत मराठी माणसांबाबत वादग्रस्त विधान केले. यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “निशिकांत दुबे यांचं वक्तव्य तुम्ही पूर्ण ऐकलं तर ते संघटनेच्या संदर्भात बोलले आहेत. ते मराठी माणसांना त्यांनी सरसकट म्हणालेले नाही. तथापि, माझं मत असं आहे की अशा पद्धतीने बोलणं योग्य नाही. कारण त्याचे जे अर्थ निघतात ते अर्थ हे लोकांच्या मनात संभ्रम तयार करतात. मराठी माणसांचं ऐतिहासिक योगदान या महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठं आहे,” असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निशिकांत दुबे यांच्या वादग्रस्त विधानावर प्रतिक्रिया दिली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे फडणवीस म्हणाले की, “ज्यावेळी परकीय आक्रमणांनी या भारताची संस्कृती संपवण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी ते जीवंत ठेवण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनी केलं. आणि त्यानंतर मराठ्यांनी संपूर्ण भारतामध्ये आपली संस्कृती जीवंत ठेवण्यासाठी परकीय आक्रमणांच्या विरुद्ध लढाई केली. पानिपतची लढाई करुन अखंड हिंदुस्थानसाठी मराठे लढले. हा मराठ्यांचा इतिहास आहे. तसेच देशाच्या जीडीपीमध्ये सर्वांत जास्त योगदान देणारा आमचा महाराष्ट्र आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि मराठी माणसांचं योगदान हे देशाच्या इतिहासामध्ये आणि वर्तमानामध्ये कोणीच नाकारु शकत नाही. आणि जर कोणी नाकारण्याचा प्रयत्न करत असेल तर ते अत्यंत चुकीचे आहे,’ असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा