devendra fadnavis raction on Minister Raksha Khadse's daughter's molestation case
नागपूर : राज्यामध्ये महिला सुरक्षेचे प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावरील अत्याचाराचे प्रकरण ताजे असताना मंत्र्यांच्या मुलीसोबत गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. काही टवाळखोरांनी रक्षा खडसेंच्या मुलींसह अन्य मुलींची छेड काढली. याबाबत दोन दिवसांपूर्वी तक्रार करूनही पोलिसांनी कोणावरही कारवाई केली नाही, त्यामुळे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी पोलीस स्टेशनमध्ये जात अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला आहे. या प्रकरणावर आता मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मंत्र्यांच्याच मुली असुरक्षित असल्याचे समोर आले आहे. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार जळगावमध्ये घडला आहे. जळगावमधील मुक्ताई मंदिरात रक्षा खडसे यांच्या मुलीची टवाळखोरांनी छेड काढली. धक्कादायक म्हणजे, पोलीस सुरक्षा रक्षक असतानाही टवाळखोरांनी छेड काढली. दरम्यान, टवाळखोरांवर योग्य ती कारवाई केली जाईल, महिला आयोगाकडून या घटनेचा पाठवुरावा केला जाईल, असे रूपाली चाकणकर यांनी सांगितले. या प्रकरणावर आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मंत्र्यांच्या मुलींची पोलीस सुरक्षा असताना देखील छेड काढली जात असल्याबाबत माध्यमांनी प्रश्न केला. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, “आरोपींना माफी देता कामा नये. त्यांच्यावर कडक कारवाई होणारच. खडसेंच्या नातीला छेडणारे एका विशिष्ट पक्षाचे आहेत. दुर्दैवाने त्यात एका विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी आहेत. ज्यांनी अतिशय वाईट काम केलेले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. काहींना अटक केली आहे. इतरांनाही अटक केली जाईल. पण अशाप्रकारे छेड काढणं, त्रास देणं हे अतिशय चुकीचं आहे. कोणत्याही परिस्थितीत अशा लोकांना माफी देता कामा नये. त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई होईल,” असे मत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना या प्रकरणामध्ये वेगळाच संशय असल्याचे ते म्हणाले आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
या प्रकरणावरुन एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचे सांगितले आहे. याबाबत एकनाथ खडसे म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ दखल घ्यावी. राजकीय दबावापोटी या गुंडांना अभय मिळत आहे. २ वर्षापूर्वी अशा काही घटनांबाबत पोलिसांना विचारणा केली तर मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आला असं पोलीस सांगायचे. आता मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आल्यानंतर या घटना दडपल्या जात असतील तर दु्र्दैव आहे. मलाही राजकारणात ४५ वर्ष झाली, अशा घटना मी पूर्वी कधी अनुभवल्या नव्हत्या. मुली भीतीपोटी तक्रारी देत नाहीत. आपण स्वत: पुढाकार घेतला पाहिजे. गुंडाविरोधात कारवाई झाली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी स्वत: यात लक्ष घालावे यासाठी मी चर्चा करणार आहे. माझ्या जवळचा असेल किंवा कुणाच्याही जवळ असला तरी हा मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. कोणत्याही लोकप्रतिनिधीच्या जवळचा असला तरी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे,” अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे.