
CJP Breaking News Update: कॉकरोच जनता पार्टीच्या कोअर कमिटीच्या बैठकीबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. सीजेपीने आपल्या भविष्यातील प्रवासाची रणनीती जाहीर केली आहे. प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याऐवजी, देशातील व्यवस्था सुधारण्यासाठी आणि सामान्य जनतेच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी एक भक्कम “दबाव गट” म्हणून सक्रीय राहण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सीजेपीने घेतला आहे. सीजेपीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा केली आहे.
यावेळी बोलताना अभिजीत दिपके म्हणाले की, या सरकारमध्ये राजीनामा होत नाही, असे या सरकारचे नेते बोलत होते. त्या सरकारमधील नेत्याचा राजीनामा घेण्याची ताकद या देशातील जेन-झी मध्ये आहे. हे तरुणांनी दाखवून दिले. आता लोक विचारतील सीजेपीची विचारधारा काय आहे, असे प्रश्न विचारत आहे. तर सीजेपीही महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणारी पार्टी असणार आहे. आम्ही सेक्युलर आहोत, लोकशाहीवर विश्वास ठेवणारे आहोत.
आता सीजेपी भविष्यात काय करणार असा प्रश्न विचारला जात आहे. याचे उत्तर हे आहे की, येत्या सप्टेंबर महिन्यापासून सीजेपी एक देशव्यापी मोहिम राबवणार आहे. त्याचे नाव असेल ” क्या बोलती पब्लिक” . या मोहिमेच्या माध्यमातून आम्ही देशभरात दौरा करणार आहोत. यात जनतेच्या समस्या, अपेक्षा काय आहेत, हे समजून घेतले जाईल. जे लोक आज सरकारमधील लोक आज जनतेपासून दूर झाले आहेत, इतकेच नव्हे तर ते जनतेचं ऐकून घ्यायलाही तयार नाहीत. ज्या देशाच्या लोकसंख्येत ६५ टक्के लोक ३५ वर्षांच्या खाली आहेत. त्या तरुणांबाबत कोणीही बोलायला तयार नाहीये. सरकार तर काहीच बोलायला तयार नाही. देशात आज बेरोजगारी आणि शिक्षण ते तरुणांसाठी सर्वात मोठे मुद्दे आहेत.. सध्या सत्ताधारी केवळ हिंदू-मुस्लिम मुद्यांवर राजकारण करत आहे. पण तरुणांच्या समस्यांकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे.
या सर्व समस्यांच्या पार्श्वभूमीवर CJP आता थेट लोकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या समजून घेणार आहे. येत्या काळात “क्या बोलती पब्लिक” या देशव्यापी मोहिमेअंतर्गत विविध शहरांमध्ये संवाद साधला आहोत.. शिक्षण हा या मोहिमेचा मुख्य मुद्दा असणार आहे. “देशात शिक्षणाचा खर्च न परवडणारा झाला आहे. अगदी इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी वर्षाला १ ते २ लाख रुपये फी भरावी लागते. शिवाय डोनेशनचा जाचक खर्च वेगळाच! ज्या कुटुंबांचे मासिक उत्पन्नच मर्यादित आहे, त्यांनी मुलांच्या कुटुंबियांनी शाळांसाठी एवढा पैसा आणायचा कुठून?” असा सवाल अभिजित दीपके यांनी उपस्थित केला.
आजच्या काळात उच्च शिक्षण घेणे म्हणजे डोक्यावर कर्ज ठेवण्यासारखे आहे. आम्हाला त्यापासून मुले आणि त्यांच्या आईवडिलांना मुक्त करायचे आहे. आपल्या देशाची शिक्षणव्यवस्था अशी झाली पाहिजे की आपल्या मुलांना डॉक्टर, इंजिनिअर , वैज्ञानिक बनवायचे असेल तर तत्यासाठी इतका पैसा कुठून आणायचा, असा प्रश्न आईवडिलांना नाही पडला पाहिजे. शिक्षण हा मूलभूत अधिकार असल्याचे डॉ. बाबासाहेबांनी म्हटले होते.
बेरोजगारी हा सध्या देशातील सर्वात मोठा आणि गंभीर मुद्दा आहे,” असे सांगत जंतर-मंतरवर मोठ्या संख्येने बेरोजगार युवक एकत्र आल्याचे त्यांनी अधोरेखित केले. “आमचे भविष्य आज अशिक्षित लोक ठरवत आहेत. कोर्टात जाऊन पक्ष चोरले जात आहेत, ज्यामुळे लोकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास हळूहळू उडत चालला आहे. २०१४ मध्ये देशातील जनतेला विकासाची केवळ खोटी स्वप्ने दाखवली गेली, असा थेट आरोप करत त्यांनी मोदी सरकारच्या कारभारावर जोरदार निशाणा साधला.