नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना घेरण्यासाठी काँग्रेसची नवी खेळी; ‘या’ पक्षाशी करणार हातमिळवणी?
काँग्रेसमधील अनेक माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे निवडणुकीत चुरस वाढणार आहे. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजप पहिल्यांदाच स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवणार आहे.
नांदेड : गेल्या काही दिवसांपासून राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच पुणे, मुंबई, नाशिक, नांदेडसह अनेक शहरांत महापालिका निवडणुका घेतल्या जाणार आहेत. त्यानुसार, विविध पक्षांकडून तयारीही केली जात आहे. असे असताना आता नांदेडमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना घेरण्यासाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येण्याची शक्यता आहे. याबाबतच्या चर्चाही सुरु आहेत.
नांदेड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे खासदार रविंद्र चव्हाण आणि वंचितचे राज्य उपाध्यक्ष फारुख अहमद यांच्यात चर्चा झाली आहे. यामुळे अशोक चव्हाण यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार आहे. त्यामुळे सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. जिल्ह्यात नेहमीच काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. यापूर्वी अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने महापालिका, जिल्हा परिषद आणि नगरपालिकांमध्ये सत्ता मिळवली आहे. पण आता अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यामुळे चित्र बदलले आहे.
दरम्यान, काँग्रेसमधील अनेक माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे निवडणुकीत चुरस वाढणार आहे. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजप पहिल्यांदाच स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवणार आहे. काँग्रेसला टक्कर देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीसोबत युती करण्याचा विचार सुरू आहे. काही दिवसांपूर्वी रविंद्र चव्हाण आणि फारुख अहमद यांच्यात याबाबत चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी युतीचे संकेत दिले आहेत.
नांदेड महापालिकेत दलित-मुस्लिम नगरसेवकांची संख्या जास्त
नांदेड महानगरपालिकेत दलित आणि मुस्लिम नगरसेवकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे युती झाल्यास मतांची विभागणी टळेल आणि दोन्ही पक्षांना फायदा होईल, असे बोलले जात आहे.
काँग्रेस आणि वंचितची नांदेडात हातमिळवणी
वंचित सेक्युलर पक्ष आहे. त्यांच्याकडून प्रस्ताव आल्यास आम्ही विचार करू. युतीबाबत चर्चा झाली नाही. पण वंचितकडून प्रस्ताव आल्यास जिल्हा कार्यकारणी विचार करेल आणि प्रदेश काँग्रेसचा सल्ला घेऊन निर्णय घेईल. युती झाल्यास सेक्युलर मतांची विभागणी टळेल आणि दोन्ही पक्षांना फायदा होईल, असे खासदार रविंद्र चव्हाण यांनी म्हटले आहे.
युतीचा प्रस्ताव आल्यास स्वागत करू
काँग्रेसचे खासदार रविंद्र चव्हाण यांनी युतीबाबत सकारात्मकता दाखवली असेल, तर आम्ही स्वागत करतो. मात्र खासदार चव्हाण यांना युतीबाबत बोलणी करण्याचे अधिकार पक्षाने दिले आहेत का? मागील लोकसभा आणि विधानसभेच्या वेळेस काँग्रेसने युतीबाबत चर्चा केली, पण ती चर्चा पूर्ण झाली नाही, तसे होऊ नये, याची काळजी घेणे गरजेचे आहे, असे वंचितचे राज्य उपाध्यक्ष फारुख अहमद यांनी सांगितले.
Web Title: Congress may alliance with vba party in nanded for upcoming municipal election