'भिडेंना चावणाऱ्या कुत्र्याची सरकारने एसआयटी चौकशी केली पाहिजे'; विजय वडेट्टीवार यांचा टोला
नागपूर : कॉमेडियन कुणाल कामरा हा सध्या चर्चेत आला आहे. कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विडंबनात्मक कविता सादर केली होती. यावरुन राज्यात जोरदार राजकारण तापले आहे. कुणालचा स्टुडिओ देखील शिंदे गटाच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी फोडला. यानंतर खार पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. दोन वेळा समन्स बजावून देखील कुणाल कामरा पोलीस स्टेशनला हजर होत नसल्यामुळे आता पोलिसांनी त्याच्या शोला आलेल्या प्रेक्षकांची चौकशी सुरु केली आहे. पोलिसांनी प्रेक्षकांना नोटीस बजावली आहे. यावरुन कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार आक्रमक झाले आहेत.
यावरुन कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. कुणाल कामराच्या प्रेक्षकांना देखील नोटीस बजावल्यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वडेट्टीवार म्हणाले की, “अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे आणि व्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीचा हा कळस आहे. कोणी कुठे जावं, काय ऐकावं यावर काही बंधन आहे का? ते प्रेक्षक करमणुकीसाठी गेले होते. जर त्या प्रेक्षकांना नोटीस बजावली जात असेल, तर या देशामध्ये कायद्याचं राज्य राहिलेलं नाही, हुकूमशाही आणि गुंडशाहीचे राज्य झाले आहे,” असा घणाघात विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्याचबरोबर भाजप आमदार सुरेश धस यांनी त्यांचा खून करण्याचा प्रयत्न असल्याचा गंभीर दावा केला. यावर विजय वडेट्टीवार म्हणाले की, “धनंजय मुंडे आणि सुरेश धस हे दोघे सत्तेतील व्यक्ती एकमेकांवर आरोप करत आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे की, गुंडगिरी करणारी माणसं आता सत्तेत आहेत. धसांनी केलेला आरोप अत्यंत गंभीर असून, उच्चस्तरीय चौकशी केली पाहिजे. लोकप्रतिनिधींच्या खुनापर्यंतचा कट रचला जात असेल तर सरकारने याची गंभीर दखल घ्यावी. आरोपीवर कारवाई करावी,” अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र मोदी यांचे राजकीय वारसदार असतील असे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले. याबाबत विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “सत्ता सर्वांना प्रिय असते. मोदी 75 वर्षाचे झाल्यानंतर ही खुर्चीवर राहण्याची सूट दिली असेल, तो त्यांच्या पक्षांतर्गत विषय आहे. कोणाला किती वयापर्यंत पदावर ठेवायचं, जर भाजपने मोदींना 90 वर्षाचे होईपर्यंत पदावर ठेवण्याचा निर्णय घेतला असेल तर तो भाजपचा निर्णय आहे. त्यावर आमचा आक्षेप असल्याचा कारण नाही,” असे स्पष्ट मत कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “नवीन आर्थिक वर्षात शेतकऱ्यांना दिलेली वचने पूर्ण करा, शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे, त्यांच्या कुटुंबांना वाचवा. शेतकरी कर्जातून मुक्त करा, अशीच आमची अपेक्षा आणि मागणी आहे. राज्याची आर्थिक स्थिती चांगली नाही. राज्य कर्जबाजारी झाला आहे. कर्ज काढून राज्य चालवणे हेच सरकारचे हाती आहे. नवीन योजना ते सुरू करू शकत नाही. येणाऱ्या काही महिन्यांमध्ये कर्मचाऱ्यांचे पगार देताना सरकारची दमछाक होईल अशी स्थिती राज्याची आहे. देशाची आर्थिक स्थिती खिळखिळी झालेली असताना बारा लाख कोटी रुपये उद्योजकांचे माफ केले आहे. मात्र, शेतकऱ्यांना एक रुपयाची ही कर्जमाफी दिली गेलेली नाही. अमेरिकेने सध्या टेरिफ वाढवण्याची धमकी दिली आहे. त्यानंतर शेअर बाजारात गेल्या काही दिवसात जो फुगवटा झाला होता, तो खाली येऊन शेअर बाजाराची सत्यस्थिती समोर येत आहे,” अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.