Ajit pawar did not give reaction on manikrao kokate controversial statement
पुणे : राज्यामध्ये सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे चर्चेमध्ये आले आहेत. कृषीमंमत्री माणिकराव कोकाटे हे नेहमीच त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. आता मात्र कोकाटे यांनी कळस गाठला आहे. विधानसभेच्या सभागृहामध्ये माणिकराव कोकाटे हे जंगली रम्मी खेळताना दिसून आले आहेत. त्यांचा गेम खेळताना व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र या प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चुप्पी ही राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी माध्यमांशी संवाद साधून जंगली रम्मी खेळणाच्या व्हिडिओबाबत सावरासावर करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा पाय अधिकच खोलात गेला आहे. जंगली रम्मी खेळण्याचे कारण देताना माणिकराव कोकाटे यांनी थेट सरकारलाच भिकारी म्हटले. सत्ताधारी पक्षामध्ये असताना आणि स्वतः मंत्रिमंडळांमध्ये असणाऱ्या माणिकराव कोकाटे यांनी वादग्रस्त विधान केले. यामुळे आता नेत्यांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
कृषीमंत्री माणिकाराव कोकाटे यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “कोकाटे नेमके काय म्हणाले ते मी ऐकलेलं नाही. तथापि त्यांनी असं विधान केले असेल तर एखाद्या मंत्र्याने असे विधान करणे चुकीचे आहे. पीकविमा पद्धत बदलण्याचा निर्णय आपण जाणीवपूर्वक घेतलेला आहे, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
शेतकरी नाही तर शासन भिकारी आहे या कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, जो काही प्रकार घडला आहे, त्याला माणिकराव कोकाटे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. याबाबतीत योग्य ती पडताळणी होईल आणि मग सत्य समोर येईल. शेतकरी आमचा अन्नदाता आहे. मायबाप आहे आणि बळीराजा हा कायम सुखी असावा. आम्ही नेहमी बळीराजासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करत असतो .शेतकरी भिकारी नाही शासन भिकारी आहे, असे मंत्री महोदयांनी बोलू नये आणि बोलले असतील तर बोलू नये. अजित पवार त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत. माणिकराव कोकाटे यांच्या बाबतीत ते निर्णय घेतील, असे मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
अजित पवारांचे ‘मौन’
माणिकराव कोकाटे यांची वादग्रस्त विधानांची मालिका थांबण्याचे काही नाव घेत नाही. सत्ताधारी इतर पक्षांनी अजित पवार हे निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याबाबत अजित पवार यांना माध्यमांनी प्रश्न विचारला. यावेळी त्यांनी मौन बाळगले. माध्यमांनी राजीनाम्याबाबत विचारताच धन्यवाद असे म्हणत अजित पवार हे निघून गेले. माणिकराव कोकाटे यांच्या रम्मी खेळण्यावर किंवा सरकारला भिकारी म्हणण्यावर अजित पवार यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाण यांचा थेट राजीनामा अजित पवारांनी घेतला आहे. तर येत्या शनिवारी अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. यावेळी माणिकराव कोकाटेंबाबत निर्णय घेतला जाईल की त्यांना यावेळी देखील समज दिली जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.