dcm ajit pawar on A different political view
बारामती : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहेत. त्यामुळे राजकारण रंगले असून आरोप प्रत्यारोप देखील केले जात आहे. महायुती आणि महाविकास आघाडी पहिल्यांदाच विधानसभेला सामोरे जात असल्यामुळे यंदाची विधानसभा रंगणार आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला फटका बसल्यामुळे विधानसभेसाठी जोरदार तयारी केली जात आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवीन गौप्यस्फोट केला आहे. वर्षभरापूर्वी वेगळी राजकीय भूमिका घेतल्यावर पुन्हा एकदा त्यांनी भाष्य केले आहे. हे सगळं साहेबांना सांगून केलं असल्याचा नवा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला आहे.
बारामतीमध्ये एका डॉक्टर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला अजित पवार यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी उपस्थित डॉक्टरांना संबोधित करताना अजित पवार यांनी भूमिका मांडली. यावेळी अजित पवार म्हणाले की, “मला काही राजकीय भूमिका घ्यावी लागली, ती भूमिका मी साहेबांना सांगूनच घेतली. साहेब पहिल्यांदा हो बोलले, नंतर पुन्हा साहेब म्हणाले मला ते योग्य वाटत नाही. अर्थात तो त्यांचा अधिकार आहे. कारण त्यांच्या नेतृत्वातच आम्ही सगळी पुढं गेलो. ‘पण हे सगळं होत असताना तुम्हाला कधी त्रास झाला नाही, कारण आम्ही परिवार म्हणून एक होतो. त्याच्यामुळे काही अडचण नव्हती . पण आता काय दोन पक्ष झाले आहेत. ‘ असं ते म्हणाले. ‘ प्रत्येकाने कुठे ना कुठे थांबावं लागतं,” असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.
हे देखील वाचा : भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला…; काश्मीरच्या पराभवानंतर काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
पुढे ते म्हणाले की, “लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्याविरोधात घरातील उमेदवार देणं ही माझी चूक होती, मी ती आधीही मान्य केली होती आणि आताही मान्य करतो,” असे म्हणत अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये झालेली चूक मान्य केली. त्यानंतर आता अजित पवार हे बारामतीमधून विधानसभा लढणार नाहीत,अशी चर्चा होती. यावर आता पूर्णविराम लागला आहे. अजित पवार गटाचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी याबाबत स्पष्ट सांगितले आहे. अजित पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार असल्याची घोषणा प्रफुल्ल पटेल यांनी केली आहे.