DCM Eknath Shinde reacts to Kunal Kamra case in Legislative Council
मुंबई : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. आज अधिवेशनाचा अखेरचा दिवस आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेमध्ये अखेरचा प्रस्ताव मांडला. यावेळी राज्यातील अनेक राजकीय परिस्थितीवर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दोन दिवसांपूर्वी कॉमेडियन कुणाल कामरा याने शिंदेंच्या राजकारणावर विडंबनात्मक कविता सादर केली. यामुळे शिंदे गट आक्रमक झाला. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी कामराचा स्टुडिओ फोडला. हे प्रकरण जोरदार चर्चिले गेल्यानंतर कामराने माफी मागण्यास नकार दिला आहे. या प्रकरणावर आता एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेमध्ये स्पष्ट मत मांडले आहे. तसेच कुणाल कामरा याचा विधान परिषदेमध्ये एकनाथ शिंदेंनी समाचार घेतला आहे.
एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेमध्ये आपले मत मांडले. ते म्हणाले की, “आता जे म्हणत आहेत की अभिव्यक्ती स्वातंत्र्य, संविधानाचा गळा घोटला, अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा गळा घोटळा हे आता म्हणत आहेत. यांचे अनेक उद्योग आहेत. ते आम्ही बाहेर काढत नाहीये. यांचे ते उद्योग बाहेर काढले तर हातातले कोरे संविधान घेऊन हे कुठे पळणार? त्याने सुद्धा संविधान दाखवलं. त्यामुळे मी एवढंच सांगतो हा कार्यकर्त्यांनी पेटवा मशाल…आम्ही बंगल्यात झोपतो खुशाल, ही यांची पद्धत आहे,” असा खोचक टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे.
कुणाल कामरा याने देखील संविधानाची प्रत दाखवली. याबाबत शिंदे म्हणाले की, “केतकी चितळेला तुरुंगात डांबलं तेव्हा संविधान कुठे होतं? हनुमान चालीसा म्हटली म्हणून राणा दाम्पत्याला तुरुंगात धाडलं तेव्हा संविधान कुठे होतं? खोट्या केसेस करुन देवेंद्र फडणवीसांना तुरुंगात पाठवण्याचं षडयंत्र रचलं तेव्हा कुठे होतं संविधान? उद्योजकाच्या घरासमोर बॉम्ब पेरताना कुठे होतं संविधान? वाझे हा काही लादेन नाही म्हणताना संविधान आठवलं नाही का? कंगनाच्या ऑफिसवर बुलडोझर चालवला तेव्हा कुठे होतं संविधान? फडतू म्हणाले त्यांच्या पायाशी लोटांगण घालताना संविधान कुठे होतं? असे सवाल एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
एकनाथ शिंदे म्हणाले की, “गद्दार कोण आहे याचा निकाल जनतेने दिला आहे. बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा कार्यकर्त्यांच्या मागे उभे राहिले ना. म्हणून तर शिवसेना उभी राहिली. रोज पायऱ्यांवर रोज मीडिया समोर आरोप करता. रोज हेच करता. झाले आता अडीच वर्षे. लोकांनी दाखवलं की, कोण खरं आहे आणि कोण खोट आहे? कोण लोकांचं आहे आणि कोण जनतेचं आहे? कोण जनतेसाठी काम करत आहे हे त्यांनी दाखवलं आहे. हे झालं आता सगळं. तरी सुद्धा सुधरत नाहीत. सुपारी घेत बदनामी सुरु झाली आहे,” असा घणाघात एकनाथ शिंदेंनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मुंबई खड्डेमुक्त होण्यासाठी उपाययोजना केल्या असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ते म्हणाले की, “मी मुख्यमंत्री झालो, तेव्हा मी देवेंद्र फडणवीस यांच्यासह पालिका आयुक्तांची भेट घेतली. यावेळी त्यांना मुंबईमध्ये दर पावसाळ्यामध्ये रस्त्यांना पडणारे खड्डे आणि त्यामुळे लोकांचा जाणारा जीव हे कधी थांबणार आहे? एकदाच रस्ते कॉंक्रीटचे का बनवत नाही असा प्रश्न विचारला. यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये 301 आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 400 असे एकूण 701 रस्त्याच्या कॉंक्रीटिकरणाचे काम सुरु आहे. काम सुरु असल्यामुळे अनेकदा नागरिकांची गैरसोय होत आहे. मात्र पुढील 25 वर्षे तरी मुंबई खड्डेमुक्त राहिल असे काम केले आहे,” अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.