
difficult task of informing Ajit Pawar's mother, Asha Pawar about his accidental death
Ajit Pawar Passed Away : बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे बारामतीमध्ये अपघाती निधन झाले आहे. काल (दि.28) अजित पवारांच्या विमानाचा लँडिंगवेळी भीषण अपघात झाला. काल सकाळी ते जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी बारामतीत येत होते. मात्र बारामती विमानतळावर विमान लँडिंगवेळी त्यांच्या विमानाला अपघात झाला. या अपघातात अजित पवांरासह विमानातील एकूण ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्याआधी काही वेळापूर्वीपासून अजित पवारांच्या आई आशाताई पवार या फार्म हाऊसवर सकाळच्या सुमारास टीव्ही पाहत बसल्या होत्या.
अजित पवार यांच्या विमानाचा अपघात हा सुमारे 8.45 वाजता झाला. मात्र 9.30 पर्यंत अजित पवार यांच्या अपघाताच्या आणि निधनाच्या बातम्या टीव्हीवर आल्या. अचानकपणे अजित पवारांच्या मृत्यूची बातमी टीव्हीवर आल्यामुळे काटेवाडीसह संपूर्ण बारामती आणि महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ उडाली. अजित पवारांचा अपघात झाला यावेळी त्यांच्या मातोश्री आशाताई पवार या टीव्ही बघत बसल्या होत्या. यावेळी काटेवाडीमध्ये पवार फार्म हाऊसमध्ये काय झाला याचा प्रसंग फार्म हाऊसवरील मॅनेजर संपत धायगुडे यांनी सांगितला आहे. एका वाहिनीशी त्यांनी संपर्क साधून हा प्रसंग सांगितला आहे.
हे देखील वाचा : अजित पवारांवर बारामतीत आज केले जाणार अंत्यसंस्कार
ते म्हणाले की, “सकाळी सात वाजता नेहमीप्रमाणेच अजितदादांच्या आई फार्म हाऊसवरती टीव्ही पाहत बसल्या होत्या. त्यांना नाश्ता देण्याची तयारी सुरू होती. त्यानंतर सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास अजितदादांच्या विमान अपघाताची बातमी टीव्हीवर आली होती. आईंनी लगेच आम्हाला विचारलं ‘अरे दादांचा अपघात झाला आहे का?’ पण त्यांनाही वाटलं की अजितदादांना खरचटलं वगैरे असेल, त्यांना काही झालं नसेल.”
पुढे संपत धायगुडे म्हणाले की, “बारामतीमध्ये हॉस्पिटलमध्ये दादांना आणल्याची बातमी टीव्हीवर आली. त्यावेळी आम्ही लगेच आईला पुढच्या बातम्या कळू नयेत, यासाठी बंगल्यावरील टीव्हीची केबल तोडली आणि टीव्ही बंद पडला असल्याचं सांगितलं. त्यांचा मोबाईलही फ्लाईट मोडवरती टाकून दिला. काही झाले नसल्याचे आम्ही त्यांना सांगत होतो. पण दादांना भेटून येऊ चला असे म्हणून त्या फार्महाऊसच्या बाहेर चालतच निघाल्या होत्या. ड्रायव्हरने गाडी बंद पडल्याचेही सांगितले. पण त्या ऐकल्या नाहीत. शेवटी नाईलाजाने त्यांना आम्ही बारामती येथील बंगल्यावर घेऊन गेलो,” अशी माहिती संपत धायगुडे यांनी दिली आहे.
हे देखील वाचा : विमानात बसण्यापूर्वी अजित पवारांचा पत्नी सुनेत्रा पवारांना ‘तो’ फोन ठरला अखेरचा; नेमकं काय म्हणाले होते
अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवारांना सांगायचं तरी काय? असा प्रश्न पवार कुटुंबीयांसमोर होता. त्यामुळे अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूची बातमी शरद पवार यांना देण्यात आली नव्हती. मेडिकल चेक अपसाठी पवार यांना रुग्णालयात नेण्यात आले होते. पवार यांना घेऊन कुटुंबीय पुन्हा घरी आले. घरात कुटुंबियांकडून दादांच्या अपघाती निधनाची माहिती पवारांना देण्यात आली. अपघाती निधनाचे वृत्त समजताच शरद पवार बारामतीसाठी रवाना झाले होते.