Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांवर बारामतीत आज केले जाणार अंत्यसंस्कार
बारामती : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी सकाळी ८.४५ वाजता बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान चार्टर्ड विमान अपघातात निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. या दुर्घटनेत पवारांचे सुरक्षा रक्षक, दोन पायलट आणि एक महिला क्रू मेंबरसह एकूण ५ जणांना जीव गमवावा लागला. बारामतीत आज सकाळी ११ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील नेहमीच चर्चेत राहिलेला चेहरा होते. बारामती ही त्यांची राजकीय कर्मभूमी होती. आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत ते बारामतीसाठी जगले आणि त्यांचा मृत्यूही बारामतीतच झाला. त्यांना राज्यात ‘दादा’ म्हणून संबोधले जात असे, जे त्यांच्या स्पष्टवक्तेपणाची आणि कर्तृत्वाची ओळख होती. बुधवारीही ते पंचायत निवडणुकीच्या जाहीरसभांना संबोधित करण्यासाठी सकाळी ८.१० वाजता मुंबईहून बारामतीसाठी रवाना झाले होते.
याबाबत केंद्रीय विमान वाहतूकमंत्री राममोहन नायडू यांनी सांगितले की, पायलटने बारामती विमानतळावर लँडिंगचा प्रयत्न केला होता, परंतु रनवे स्पष्ट दिसत नसल्याने त्याने विमान पुन्हा उंचीवर नेले. पहिला प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर रनवे-११ वर पुन्हा लँडिंगचा प्रयत्न करण्यात आला. यादरम्यान विमान धावपट्टीपासून सुमारे ३ किमी आधीच एका उसाच्या शेतात कोसळले आणि त्याला आग लागली. यादरम्यान पायलटने कोणताही ‘इमर्जन्सी सिग्नल’ किंवा ‘मे-डे’ कॉलही दिला नव्हता. दरम्यान, एअरक्राफ्ट ऑक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने अपघाताचा तपास सुरू केला आहे.
बारामतीत आज केले जाणार अंत्यसंस्कार
अपघातानंतर घटनास्थळावरून अजित पवारांसह पाचही मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. शवविच्छेदनानंतर मृतदेह निवासस्थानी पोहोचवण्यात आले. अजित पवारांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी बुधवारी संध्याकाळी पाच वाजेपासून विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात ठेवण्यात आले, जिथे हजारो लोकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. अंतिम यात्रा आज सकाळी ९ वाजता सुरू होईल आणि सकाळी ११ वाजता विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यसंस्कार केले जातील. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत.
मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री बारामतीत
मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातील मंत्री व आमदार बारामतीला पोहोचले आहेत. राज्यात २८ ते ३० जानेवारी या तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
हेदेखील वाचा : Ajit Pawar Death: काय तो रुबाब, काय तो राजेशाही थाट! अजित पवारांच्या ताफ्यात होती एकापेक्षा एक भन्नाट कार, किंमत…






