नागपुरात निवडणुकीपूर्वीच काँग्रेसमध्ये वाद; माजी मंत्री सुनील केदारांना आव्हान
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यात नागपूर जिल्हा काँग्रेसमध्ये अद्याप ‘ऑलवेल’ नसल्याचे समोर आले आहे. पक्षाचे निरीक्षक व प्रभारी माघारी फिरल्यानंतर पुन्हा वादाची ठिणगी पडत आहे. प्रदेशाध्यक्षांकडून सर्वांना एकत्र करण्याचे प्रयत्नही फसत असल्याचे दिसत आहे. यावरून निवडणुकीपूर्वीच जिल्हा काँग्रेसमधील वाद पुन्हा एकदा उफाळून आला. परिणामी, संघटना बळकट करण्याचे व एकसंघ ठेवण्याच्या प्रयत्नाला खीळ बसण्याचे संकेत आहेत.
बुटीबोरीत जिल्ह्यातील काँग्रेसजणांनी समांतर मेळावा घेतला. काही महिन्यांपूर्वी याच ठिकाणी जिल्हा काँग्रेसच्या एका गटाने मेळावा घेतला होता. त्यावेळी निमंत्रण न दिलेल्या माजी पदाधिकारी व पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांना डावलले होते. त्याच कार्यकर्त्यांनी हा समांतर मेळावा घेत एकप्रकारे माजी मंत्री सुनील केदार यांना आव्हान दिल्याचे मानले जात आहे.
हेदेखील वाचा : Sanjay Raut : “आनंद दिघे नेते, उपनेते नाही, तर….”, संजय राऊतांविरोधात ठाण्यात आंदोलन
दरम्यान, काँग्रेसमध्ये कायम मतभेदाची भिंत कायम राहिली आहे. जिल्ह्यात तर माजी मंत्री सुनील केदार यांची एकहाती वर्चस्व राहिले आहे. ते आजही कायम आहे. माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक हे जिल्हाध्यक्ष असतानाही केदार यांच्या शब्दाबाहेर पक्ष निर्णय घेत नव्हता. त्यामुळे दुसऱ्या गटातील अस्वस्थता कायम उघड व्हायची. परंतु, पक्ष नेतृत्व केदारांना बळ देत असल्याने कार्यकर्तेही पक्षाबद्दल असलेली निष्ठा बघता आक्रमक विरोध करीत नव्हते.
बुटीबोरी येथील मेळाव्यात माजी सरचिटणीस मुजीब पठाण, माजी जिल्हाध्यक्ष बाबा आष्टणकर व इतरही विद्यमान पदाधिकारी उपस्थित होते. यावरून जिल्हयात काँग्रेसमध्ये ‘ऑलवेल’ नाही, असे दिसत आहे.
प्रांताध्यक्षांनी एकत्र बसवावे
पक्षाला बळकट करण्यासाठी प्रांताध्यक्षांच्या भूमिकेचे सर्व काँग्रेसजणांकडून स्वागत होत आहे. मात्र, त्यांना सर्वच जिल्ह्यातील परिस्थितीचा तेवढा अंदाज नाही. कोणत्या जिल्ह्यात काय सुरू आहे, कोणते नेते. पदाधिकारी व कार्यकर्ते पक्षासाठी महत्त्वाचे आहेत, याचाही त्यांना पुरेसा अंदाज नसल्याची ओरडही आहे. त्यामुळे प्रांताध्यक्षांनी जिल्ह्यातील सर्व नेत्यांना एकत्र बसवून चर्चा करणे अपेक्षित असल्याचे बोलले जात आहे.
निरीक्षकांचेही चालेना
प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी राज्यात पक्षसंघटन बळकट करण्यासाठी प्रयत्न चालविले आहे. यानुसार त्यांनी जिल्हाध्यक्षांच्या निवडीपूर्वी काही निरीक्षकही नेमले होते. या निरीक्षकांनी संबंधीत जिल्ह्यात जाऊन कार्यकर्त्यांचे मत जाणून घेणे अपेक्षित होते. मात्र, काही निरीक्षक हे केवळ टीळा लावायला आल्याची चर्चा होती.