
नगरपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेससह शिवसेनेचा पराभव; 'इथं' तब्बल 24 उमेदवारांचे डिपॉझिटच जप्त
वैजापूर : नगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांना मतदारांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी, एकूण २४ उमेदवारांची डिपॉझिट अर्थात अनामत रक्कम जप्त झाल्याची माहिती समोर आली आहे. यात नगरसेवकपदासाठीचे २३ उमेदवार तर नगराध्यक्षपदाच्या एका उमेदवाराचा समावेश आहे.
या निवडणुकीत अनामत रक्कम जप्त झालेल्यांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), एमआयएम, वंचित बहुजन आघाडी तसेच अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे नगराध्यक्षपदासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून निवडणूक लढवलेले सुभाष गायकवाड यांनाही आवश्यक किमान मते न मिळाल्याने त्यांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.
हेदेखील वाचा : Solapur Municipal Election : प्रशासनाकडून निवडणुकीची जय्यत तयारी: ईव्हीएम वितरण, स्ट्रॉग रूम, मतमोजणी ठिकाणे निश्चित
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, प्रत्येक उमेदवाराने नामांकन अर्ज दाखल करताना ठराविक अनामत रक्कम भरावी लागते. मात्र, जर एखाद्या उमेदवाराला पडलेल्या वैध (१/८) मतेही मिळाली नाहीत, तर त्याची अनामत रक्कम जप्त केली जाते. मात्र, नामांकन अर्ज रद्द झाल्यास किंवा उमेदवाराने अर्ज मागे घेतल्यास ही रक्कम परत केली जाते. तसेच निवडणूक प्रक्रियेदरम्यान उमेदवाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना अनामत रक्कम परत देण्याची तरतूद आहे. मात्र, मतदारांकडून आवश्यक मतांची पूर्तता न झाल्यास नियमाप्रमाणे रक्कम जप्त केली जाते.
या निकालामुळे काही पक्षांना वैजापूरमध्ये अपेक्षेपेक्षा कमी यश मिळाल्याचे चित्र स्पष्ट झाले असून, अनेक नवोदित तसेच अनुभवी उमेदवारांना मतदारांचा विश्वास संपादन करण्यात अपयश आले आहे. निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर अनामत जप्त झाल्याची चर्चा सध्या शहरात चांगलीच रंगत आहे.
या उमेदवारांना वाचवता आली नाही अनामत रक्कम
सुभाष गायकवाड (काँग्रेस) १०४७ मते, समी शेख (एमआयएम) १०८, सय्यद मुजफ्फर (वंचित बहुजन आघाडी) – ७, शालू मोटे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार) – ५७, खान जाबाज (वंचित बहुजन आघाडी) ३९, पठाण जुनेद (काँग्रेस) १०९, दीपककुमार मालकर (शिवसेना उबाठा) ३९, शेख साबिहा (काँग्रेस) ११३, सय्यद आफरीन (एमआयएम) २३८, मेहुल पोकर्णे (अपक्ष) २२२, हितेश रामैय्या (काँग्रेस) ६६, दीपक त्रिभुवन (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार) -१३४, शाक्यासिंह त्रिभुवन (काँग्रेस) १२४, कैलास आंबेकर (काँग्रेस) – ६३, बिनबिलेस यासेर (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार) १२६, शेख शमीम (शिवसेना उबाठा) २२८ सविता धुळे (काँग्रेस) – ८२, सुनील त्रिभुवन (अपक्ष) – ३१, शुभम नन्नवरे (शिवसेना उबाठा) ३०, सिद्धार्थ बागुल (वंचित बहुजन आघाडी) ४७, संदीप वाघ (काँग्रेस)- ७४, विशाल शिंदे (अपक्ष) – २०, रेखा आंबेकर (काँग्रेस) – २४७, पूजा क्षीरसागर (काँग्रेस) – १४७.