Girish Mahajan reacts on NCP upset leader Chhagan Bhujbal joining BJP
नाशिक : महायुतीचे राज्यामध्ये सरकार स्थापन झाले असून त्याला दोन महिने झाले आहेत. मात्र निवडणुकीनंतर राज्यामध्ये जोरदार राजकारण तापले आहे. महायुतीमध्ये नाराज नेत्यांचा पूर आला आहे. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये संधी न दिल्यामुळे अनेक नेते नाराज आहेत. त्याचबरोबर खातेवाटप आणि पालकमंत्रिपदावरुन देखील महायुतीमध्ये अंतर्गत धुसफूस सुरु आहे. अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे देखील महायुतीमध्ये नाराज असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता नाराज छगन भुजबळ हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावर होते. यावेळी नाशिक जिल्ह्यातील मालेगावातील एका कार्यक्रमात अमित शाह आणि छगन भुजबळ हे व्यासपीठावर शेजारी बसलेले पाहायला मिळाले. शाह यांनी स्वतःहून भुजबळांना त्यांच्या शेजारची खुर्ची दिली. यामुळे छगन भुजबळ यांची भाजपमध्ये जवळीक वाढत असल्याचे दिसत आहे. तर दुसऱ्या बाजूला भुजबळ हे अजित पवार यांच्यावर नाराज असून थेट आपली नाराजी व्यक्त करत आहेत. छगन भुजबळ यांनी पक्षाच्या बैठकीमध्ये देखील अजित पवार यांच्यासोबत संवाद साधला नाही. छगन भुजबळ यांच्या भाजप प्रवेशावर भाजप नेते व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
काय म्हणाले जलसंपदा मंत्री गिरीश महाजन?
अमित शाह व छगन भुजबळ हे मालेगावमधील कार्यक्रमामध्ये एकाच मंचावर आले होते. यावेळी त्यांनी एकत्र बसून संवाद साधल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले. यावर मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, “मालेगावमधील कार्यक्रम भारतीय जनता पार्टीचा नव्हता, तो शासकीय कार्यक्रम होता. त्यामुळे तिथे सर्वच पक्षांचे लोक होते. “त्या कार्यक्रमात अमित शाह यांनी छगन भुजबळ यांना खुर्ची दिली असेल तर त्यात गैर काहीच नाही”, असे मत गिरीश महाजन यांनी मांडले आहे.
महाराष्ट्र संबंधित बातम्या वाचा एका क्लिकवर
पुढे गिरीश महाजन म्हणाले की, “मला वाटतं तो भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम नव्हता. तो एक शासकीय कार्यक्रम असल्यामुळे सर्वच मंत्र्यांना व आमदारांना त्या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं होतं. माझ्या माहितीप्रमाणे १४ मंत्र्यांना या कार्यक्रमाचं निमंत्रण पाठवण्यात आलं होतं. छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत, हे वरिष्ठ नेते अनेक वर्षे मंत्री देखील राहिले आहेत. सहाजिकच त्यांना खुर्ची देण्यात गैर काहीच नाही. तुम्ही वारंवार भुजबळांबाबत प्रश्न विचारत आहात, मात्र मी त्यावर काही बोलू शकत नाही. त्याबाबत वरिष्ठ नेते चर्चा करतील. भुजबळ आमच्या वरिष्ठांशी बोलतील. देवेंद्र फडणवीस किंवा इतर कुठल्यातरी नेत्याशी बोलतील,” असे मत गिरीश महाजन यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे अमित शाह व छगन भुजबळ यांच्यामधील संबंध वाढत असून भुजबळ यांनी देखील आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे रादरीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.