'दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना किमान एक लाख रुपये द्या'; उद्धव ठाकरेंची मागणी
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची संभाजीनगरमध्ये जाहीरसभा झाली. यामध्ये त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. राज्य सरकारने 31 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. हे फसवे पॅकेज आहे. मात्र, मी यालाही समर्थन करायला तयार आहे. दिवाळीपूर्वी बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर किमान एक लाख रुपये टाका. त्यांची दिवाळी गोड करा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी सरकारकडे केली.
राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी 31 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. याच्याविरोधात तसेच शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवण्यासाठी शिवसेनेने शनिवारी विभागीय आयुक्त कार्यालयावर हंबरडा मोर्चा काढला. यावेळी ते बोलत होते. सकाळी क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करून मोर्चाला प्रारंभ झाला. यावेळी आदित्य ठाकरे, चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. क्रांती चौक, पैठण गेटमार्गे गुलमंडी येथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.
हेदेखील वाचा : Uddhav Thackeray: ‘एक दिवस हा माणूस धोका देणार’; अनंत तरेंच्या आठवणींना उजाळा देत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला पश्चाताप
यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने विभागीय आयुक्तांना मोर्चेकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. गुलमंडी येथे सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. सभेत ठाकरे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना फटका
उद्धव ठाकरे म्हणाले, अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून निघाल्या आहेत. हातात काहीही उरले नाही. अशावेळी जाहीर केलेली ३१ हजार कोटींची रक्कम फसवी आहे, मी या पॅकेजलाही समर्थन द्यायला तयार आहे. मात्र, माझी एक अट आहे. पुढे त्याला रबीचे पीक घ्यायचे आहे. पैसे नाही. त्यात दिवाळी आहे, सण कसा साजरा करणार? यासाठी माझ्या शेतकऱ्याच्या खात्यात दिवाळीपूर्वी किमान एक लाख रुपये जमा करा. त्याची दिवाळी गोड करा, अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली.
‘मी आरशात बघतो, तुम्ही शेतकऱ्यांकडे बघा’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही संभाजीनगर आले असता त्यांनी हंबरडा मोर्चावरून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत टीका केली होती. ठाकरेंनी एकदा आरशात पाहिलं तर मोर्चा काढण्याचा त्यांना अधिकारच नाही हे त्यांना कळेल, अशी टीका त्यांनी केली होती. यावर शनिवारी (दि. ११) उत्तर देत ठाकरे म्हणाले, मी आरशात बघतो. मात्र, तुम्ही किमान शेतकऱ्यांकडे तरी बघा कर्तव्य म्हणून मी शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत पीक कर्जमुक्ती केली होती. जो नियमित कर्जफेड करतो, त्याला ५० हजारांची रक्कम जाहीर केली होती. ती कर्जमुक्ती आजही सुरु आहे. मी जे करायचं ते केलं आता तुम्ही किमान शेतकऱ्याकडे तरी बघा, लगेच रब्बी हंगाम आहे.