एक दिवस हा माणूस धोका देणार...; अनंत तरेंच्या आठवणींना उजाळा देत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला पश्चाताप
Thane Politics:“ठाणे जिल्ह्याचे माजी महापौर दिवंगत अनंत तरे यांचं म्हणणं मी ऐकायला हवं होतं. त्यावेळी त्यांचं ऐकलं असतं तर शिवसेना फुटलीच नसती. पण आता मला अनंत तरें यांचं न ऐकल्याचा पश्चाताप होतोय, अशी खंत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली होत असल्याची खंत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली.
ठाण्यात अनंत तरे यांच्यावरील पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी दिवंगत अनंत तरेंच्या आठवणींना उजाळा दिला. अनंत तरेंचं ऐकायला हवं होतं. आता पश्चाताप होतोय असं म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. “शिंदे यांचे नाव न घेता ते म्हणाले की, काही लोक निष्ठेचा मुखवटा घालतात आणि आम्हाला त्याची माहितीही नाही. जर त्यांनी तरे यांचे ऐकले असते तर आजची परिस्थिती अशी नसती.
उद्धव ठाकरे म्हणाले, ”त्यांना आता मोठमोठी पदे मिळाली आहेत, पण ज्यावेळी त्यांचा वापर संपेल त्यावेळी ते त्यांना कचराकुंडीत फेकून देतील. त्यावेळी ते याच ठाण्यात कपाळावर हात बडवत तुम्हाला दिसतील. मी त्यावेळी अनंत तरे यांचं ऐकायला पाहिजे होते. पण आता मला त्याचा पश्चाताप होतोय. तेव्हा तरेंचं ऐकलं असतं, तर अमित शाहांसमोर हंबरडा फोडणारे आज पाहायला मिळाले नसते,” असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
ठाणे शहरातील विकासाच्या दाव्यांवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “ठाणे आता शिवसैनिकांचे शहर राहिलेले नाही, तर कंत्राटदारांचे शहर बनले आहे. विकासाच्या नावाखाली फक्त पैशांची लूट सुरू आहे. मोठ्या प्रमाणात पैसा खर्च झाला, पण विकास कुठे दिसतोय? शहराच्या तिजोरीची लूट होत आहे. मुंबई, ठाणे आणि महाराष्ट्राच्या तिजोरी लुटणाऱ्यांविरुद्ध आम्ही लवकरच तीव्र निषेध करणार आहोत,” असेही त्यांनी स्पष्ट केले.