
satej patil
Gokul Election 2026 : कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या निवडणुकीत महायुतीचे राजेश पाटील यांनी शशिकांत पाटील-चुयेकर यांचा पराभव केला. त्यामुळे काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या आघाडीला सत्तेपासून दूर राहावं लागलं.
या निकालानंतर सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेत महायुतीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली. विशेष म्हणजे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या ‘साम्राज्य उद्ध्वस्त’ करण्याच्या इशाऱ्यालाही त्यांनी प्रत्युत्तर दिलं.
चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिल्यास सतेज पाटील यांचं साम्राज्य एका दिवसात उद्ध्वस्त होईल, असं वक्तव्य केलं होतं. यावर सतेज पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.
ते म्हणाले, “चंद्रकांतदादा, सरकारी पदाचा आणि सत्तेचा वापर करून धमक्या देऊ नका. उद्ध्वस्त करतो, बघून घेतो अशा धमक्या माझ्याजवळ चालणार नाहीत. मीसुद्धा पाटील आहे. 2029 मध्ये कोल्हापूरच्या दहा मतदारसंघांत समोरासमोर लढूया. कार्यकर्त्यांच्या बळावर लढूया. अशा धमक्यांना आम्ही घाबरणार नाही.”
यावेळी सतेज पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यांवरही टीका केली. चंद्रकांतदादा मोठे होत असताना त्यांची वैचारिक पातळी खालावत चालली आहे, असा टोला त्यांनी लगावला. स्वर्गीय डॉ. डी. वाय. पाटील यांच्याबद्दल बोलून काय मिळवलं, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
‘बंटीचा बंटी साहेब झाला नाही’ या टीकेलाही त्यांनी उत्तर दिलं. मला लोकांच्या हृदयात बंटी पाटील म्हणूनच राहायचं आहे, साहेब म्हणून नाही, असं ते म्हणाले.
गोकुळच्या सत्तासंघर्षावर बोलताना सतेज पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरही आरोप केले. शासनाची व्यवस्था कशी वापरता येते, हे मुश्रीफ यांनी दाखवून दिलं, असं ते म्हणाले. मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर दबाव आणल्याचा आरोपही त्यांनी केला.
गोकुळमध्ये काही चुकीचं घडल्यास आमचे संचालक विरोध करतील, असा इशाराही त्यांनी दिला. केवळ सत्ता मिळवण्यासाठी चार जणांची नेमणूक करण्यात आल्याचा आरोप करत, या संचालकांची नियुक्ती केवळ तीन महिन्यांसाठी असल्याची माहिती मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं.
सतेज पाटील यांच्या टीकेला उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिल्यास सतेज पाटील यांचं साम्राज्य एका दिवसात उद्ध्वस्त होईल, असं वक्तव्य केलं होतं. मुख्यमंत्र्यांनी शिक्षणमंत्री म्हणून आदेश दिल्यास बंटी पाटलांचं काही शिल्लक राहणार नाही, असाही इशारा त्यांनी दिला होता.
दरम्यान, गोकुळच्या निवडणुकीनंतर सुरू झालेला हा राजकीय संघर्ष आता 2029 च्या निवडणुकीच्या आव्हानापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या राजकारणात या दोन्ही नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोपांची चर्चा सुरू झाली आहे.
Ans: गोकुळच्या निवडणुकीत सत्ता गमावल्यानंतर सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महायुतीच्या नेत्यांवर टीका करत दूध संघातील घडामोडींवर आक्षेप नोंदवले.
Ans: सरकारी यंत्रणेचा आणि सत्तेचा वापर करून धमक्या देऊ नका. 2029 मध्ये कोल्हापूरच्या दहा मतदारसंघांत समोरासमोर लढूया, असं आव्हान सतेज पाटील यांनी दिलं.
Ans: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिल्यास सतेज पाटील यांचं साम्राज्य एका दिवसात उद्ध्वस्त होईल, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं.