
BJP, Shivsena, Pune News, PMC Election, Ravindra Dhangekar,
मुंबई : जैन समाजाच्या जमिनीसंदर्भात पुण्यात राजकारण तापले आहे. शिवसेनेचे (शिंदे गट) नेते आणि माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी या मुद्यावरून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर निशाणा साधला. यावरून शिंदे गट आणि भाजप आमनेसामने आले आहे. त्यानंतरही आता धंगेकरांची भूमिका कायम आहे.
जैन समुदायाच्या जमिनीचे रक्षण करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत त्यांचा संघर्ष सुरूच राहील. जर माझी अडचण होत असेल तर मला पक्षातून काढून टाकावे, असे आव्हान त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. सत्ताधारी महायुती आघाडीत राहून धंगेकर यांनी कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात आघाडी उघडली आहे. यामुळे भाजपासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
हेदेखील वाचा : Bihar Election 2025 : पंतप्रधान मोदी आज घेणार प्रचारसभा; समस्तीपूरसह बेगूसराय येथे जनतेला संबोधित करणार
मिळालेल्या माहितीनुसार, धंगेकरांनी सत्ताधारी नेत्यांविरोधात बोलू नये, यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात आहे. परंतु, ते मागे हटण्यास तयार नाही. भाजप नेते दावा करत आहेत की, शिवसेनेचे वरिष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धंगेकरांवर योग्य कारवाई करतील. मात्र, धंगेकर यांनी यासर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत.
राजू शेट्टीही आक्रमक
याप्रकरणावर शेतकरी नेते राजू शेट्टीही आक्रमक झाले आहेत. ते म्हणाले, ‘जैन बोर्डिंग हाऊसची जमीन विकण्यामागील कारण म्हणजे मोहोळ आणि बांधकाम व्यावसायिकांमध्ये संगनमत आहे. हा करार रद्द होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. जो कोणी आमच्या मार्गात येईल त्याला आम्ही सोडणार नाही’.
मोहोळांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा
आता त्यांनी थेट मुरलीधर मोहोळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. जर भाजपा नेते मोहोळ यांना थोडीही लाज असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, असे आव्हानही धंगेकरांनी दिले आहे.
याप्रकरणावर बोलणं केलं बंद
मोहोळ धंगेकर यांच्या आरोपांनंतर मुरलीधर मोहोळ यांनीही प्रत्युत्तर दिले मोहोळ म्हणाले, मी या प्रकरणावर बोलणे बंद केले आहे. मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो की, या संपूर्ण प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही. विनाकारण मला यात गोवण्याचा प्रयत्न होत आहे.