
Ladki Bahin Yojana, Majhi Ladki Bahin Yojana July Installment
यासंदर्भात महिला आणि बाल विकास विभागाला आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांची कागदपत्रे, पात्रतेचे निकष तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक अटींची फेरतपासणी होण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत राज्य सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा किंवा सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेत झालेल्या पडताळणीदरम्यान आधीच या योजनेतील ९१ लाख लाभार्थी महिला अपात्र ठरवण्यात आले आहे. या योजनेतील अपात्र ठरवण्यात आलेल्या या ९१ लाख लाभार्थी महिलांची पुन्हा एकदा तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील लाभार्थी महिलांच्या पात्रतेचीही पडताळणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या १,५०० रुपयांच्या हप्त्याचे वितरण सुरू झाले आहे. मंगळवारपासून पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यांमध्ये हा निधी थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रणालीद्वारे जमा केला जात आहे.
रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारकडून लाडक्या बहिणींना ही भेट असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अनेक लाभार्थी महिलांना दिलासा मिळाला आहे. मात्र, एकीकडे जुलैचा हप्ता खात्यात जमा होत असताना दुसरीकडे लाभार्थींची फेरपडताळणी होण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने महिलांमध्ये उत्सुकतेसोबतच काही प्रमाणात चिंता निर्माण झाली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हा राज्यातील सुमारे २ कोटी ४७ लाख महिला लाभार्थी होत्या. मात्र, काही महिन्यांनंतर सरकारकडून लाभार्थी महिलांची ई-केवायसी आणि इतर पडताळणी प्रक्रिया सुरू करण्यात आली. सरकारने लागू केलेल्य अटीशर्थींमुळे पडताळणीनंतर लाभार्थी संख्येत मोठी घट झाली .
लाभार्थी महिलांसाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली होती. या प्रक्रियेदरम्यान अनेक महिलांनी निर्धारित वेळेत ई-केवायसी पूर्ण केली नाही. त्यामुळे सुमारे ६२ लाख महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आल्याची माहिती आहे. याशिवाय इतर कारणांमुळेही लाभार्थींच्या संख्येत घट झाली आहे.
ई-केवायसी आणि इतर पडताळणी प्रक्रियेनंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या सुमारे 1 कोटी 65 लाखांवर आली आहे. म्हणजेच योजना सुरू झाल्यापासून लाभार्थी संख्येत जवळपास 92 लाखांची घट झाली आहे.
सरकारकडून लाभार्थी यादीची छाननी आणि पडताळणी करण्यात आल्यानंतर पात्र महिलांनाच योजनेचा लाभ दिला जात आहे. त्यामुळे योजनेचा जुलैचा हप्ता कोणाला मिळणार आणि कोणाचे नाव यादीतून वगळले जाणार, याकडे महिलांचे लक्ष लागले आहे.