
ममता बॅनर्जींना मोठा धक्का! TMC चं नाव-चिन्ह गोठवलं
Mamata Banerjee : पश्चिम बंगालच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत वाद आणि पक्षातील फुटीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेत ‘ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस’ (All India Trinamool Congress) हे मूळ पक्षनाव आणि ‘Flowers & Grass’ अर्थात घासफूल चिन्ह अंतरिम स्वरूपात गोठवलं आहे. तसेच, आगामी पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाने दोन्ही गटांना स्वतंत्र नावं आणि निवडणूक चिन्हं दिली आहेत.
निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील गटाला ‘ममता ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस’ (Mamata All India Trinamool Congress) हे नाव देण्यात आलं असून, त्यांना ‘फुटबॉलपटू’ हे निवडणूक चिन्ह मिळालं आहे. दुसरीकडे बंडखोर गटाला डेमोक्रॅटिक तृणमूल काँग्रेस (Democratic Trinamool Congress) हे नाव आणि ‘लिफाफा’ हे चिन्ह देण्यात आलं आहे.
तृणमूल काँग्रेसमधील दोन गटांनी पक्षाचं नाव आणि पारंपरिक चिन्हावर दावा केला होता. हा वाद निवडणूक आयोगापर्यंत पोहोचल्यानंतर आयोगाने दोन्ही बाजूंची कागदपत्रं आणि दावे तपासले. त्यानंतर अंतरिम आदेशाद्वारे कोणत्याही गटाला मूळ ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस (All India Trinamool Congress) नाव किंवा घासफूल चिन्ह वापरता येणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं.
‘…पण महाराष्ट्र सरकार शुभ तारखा तपासण्यात व्यस्त’; दुष्काळ जाहीर करण्यावरून उद्धव ठाकरेंचा टोला
या निर्णयाचा थेट परिणाम आगामी पश्चिम बंगाल पोटनिवडणुकांवर होणार आहे. ६ ऑक्टोबरला नंदीग्राम आणि रेजीनगरसह होणाऱ्या पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांना नव्या ओळखीसह निवडणूक लढवावी लागणार आहे.
पोटनिवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना स्वतंत्र नाव आणि मुक्त चिन्ह निवडण्याची संधी दिली. त्यानुसार ममता बॅनर्जी यांच्या गटाला ‘ममता ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस’ हे नाव आणि फुटबॉलपटू हे चिन्ह देण्यात आले आहे. तर अरूप रॉय यांच्या गटाला ‘गणतांत्रिक तृणमूल काँग्रेस’ म्हणजेच ‘Democratic Trinamool Congress’ हे नाव आणि लिफाफा हे चिन्ह देण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील शिवसेना फुटीनंतरच्या पक्षनाव आणि निवडणूक चिन्हाच्या वादाची आठवण होत आहे. मात्र दोन्ही प्रकरणांची कायदेशीर आणि घटनात्मक परिस्थिती एकसारखी आहे, असं थेट म्हणता येणार नाही. तृणमूल काँग्रेसच्या बाबतीत सध्याचा निर्णय अंतरिम स्वरूपाचा असून मूळ पक्षाची ओळख आणि चिन्हाबाबतचा अंतिम वाद अद्याप स्वतंत्र प्रक्रियेत आहे.
पश्चिम बंगालमध्ये आता दोन्ही गट नव्या नाव आणि चिन्हासह मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे मतपत्रिका आणि ईव्हीएमवर पारंपरिक तृणमूल नाव-चिन्हाऐवजी नव्या ओळखी दिसणार आहेत.