Manikrao Kokate Jungle Rummy Legislative Report
Manikrao Kokate junglee rummy : मुंबई : राज्याचे नुकतेच पावसाळी अधिवेशन पार पडले. यामध्ये कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकले आहेत. राज्यातील शेतकरी मेटाकुटीला आलेला असताना कृषीमंत्री कोकाटे हे सभागृहामध्ये जंगली रमी खेळत होते. याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला होता. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे गेम खेळत असल्याचे दिसत असून यानंतर देखील कोकाटे हे खेळत नसल्याचा दावा करत होते. व्हिडिओ बघत असताना जाहिरात आली असल्याची थाप मारत माणिकराव कोकाटे यांनी विषयाला बगल देण्याचा प्रयत्न केला. मात्र आता विधीमंडळाचा अहवाल समोर आला असून यामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
देशामध्ये सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या या महाराष्ट्रामध्ये होत आहेत. अशी परिस्थिती असताना राज्याचे कृषीमंत्री हे विधीमंडळाच्या सभागृहामध्ये जंगली रमी खेळत आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जात नसताना आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. या परिस्थितीमध्ये माणिकराव कोकाटे यांचे सातत्याने येणारे असंवेदनशील वक्तव्य तसेच आता गेम खेळताना व्हिडिओ समोर आल्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर देखील केवळ व्हिडिओ बघत असून ती जाहिरात आली असल्याचे खोटे सांगितले. यावर तपास करणाऱ्या विधीमंडळाच्या समितीचा अहवाल समोर आला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
विधीमंडळाच्या या अहवालामध्ये कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे काही सेकंद किंवा जाहिरात पाहत नव्हते. तर माणिकराव कोकाटे हे तब्बल 20 मिनिटे गेम खेळत होते. विधान परिषदेच्या सभागृहामध्ये कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे तब्बल 22 मिनिटे गेम खेळत होते. यामुळे गेम खेळण्याबाबत माणिकराव कोकाटे यांचे पितळ उघड पडलं आहे. यावरुन आमदार रोहित पवार यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. आमदार रोहित पवार यांनीच माणिकराव कोकाटे यांची गेम खेळताना व्हिडिओ शेअर केला होता. त्यानंतर आता अहवाल समोर आल्यानंतर रोहित पवार यांनी कारवाईची मागणी केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
आमदार रोहित पवार यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याबाबत सोशल मीडिया पोस्ट केली आहे. रोहित पवार यांनी लिहिले आहे की, कृषिमंत्री सभागृहात केवळ ४२ सेकंद पत्ते खेळत नव्हते तर तब्बल १८ ते २२ मिनिटे पत्ते खेळत असल्याचा विधानमंडळाच्या चौकशीचा अहवाल असून हा अहवाल मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्याकडे देखील सादर केला असल्याची माहिती आहे. सरकार याबाबत खुलासा करेल का? सभागृहात तब्बल १८ ते २२ मिनिटे पत्ते खेळणाऱ्या कृषिमंत्र्यावर हे सरकार कारवाई करणार नसेल तर मुख्यमंत्र्यांना स्व. अटलजींच्या तर उपमुख्यमंत्री अजितदादांना स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचा वारसा सांगण्याचा नैतिक अधिकार उरतो का? असा सवाल आक्रमक रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.