manikrao kokate suraj chavan sanjay gaikwad Political leader fight in maharashtra politics
प्रिती माने : महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर रोज एक एक पायरी खाली उतरताना दिसतो आहे. कधी काळी महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचे उदाहरण हे देशातील इतर राज्यांमध्ये दिले जात होते. पुरोगामी असलेला महाराष्ट्र राजकीय विचारधारा सांभाळून विकासात्मक राजकारणासाठी गणला जात होता. राजकारण्यांमधील विचारांचा तीव्र विरोध आणि तरीही मैत्रिपूर्णी संबंध यामुळे देशभरामध्ये कौतुक केले जात होते. आता मात्र महाराष्ट्राच्या राजकारणाचे रोज लचके तोडले जात आहेत. जनतेचे प्रतिनिधी हे विरोधकांवर शिव्याश्रापांची लाखोली वाहत आहेत. आणि आता तर याची पातळी मारहाणीपर्यंत पोहचली आहे.
यंदाचे पावसाळी अधिवेशन हे नेत्यांमध्ये झालेल्या कडाक्यांच्या भांडणांमुळे जास्त चर्चेत आले आहे. सत्ताधारी नेत्यांनी विकासकामांवर, त्यांच्या पूर्णतेवर आणि जनतेच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रीत करणे अपेक्षित असते. मात्र महाराष्ट्रातील सत्ताधारी नेते हे सोडून हाणामारी करण्यात जास्त गुंग असल्याचे दिसत आहे. पहिल्यांदा सत्ताधारी शिंदे गटाचे नेते व आमदार संजय गायकवाड यांनी फ्री स्टाईल मारामारी करत सत्तेची मस्ती दाखवून दिली. शिळे अन्न देणाऱ्या आकाशवाणी आमदार निवासाच्या कॅन्टीन चालकाला बेदम चोप दिला. यामध्ये गायकवाडांची तप्तरता एवढी होती की ते टॉवेल आणि बनियानवर रिंगणात उतरले. कॅन्टीन चालकाला बुक्क्यांचा मारा देत त्यांनी राजकारण्यांच्या WWF चा शुभारंभ केला.
त्यानंतर या राजकीय WWF च्या रिंगणामध्ये उतरले आमदार गोपीचंद पडळकर समर्थक आणि आमदार जितेंद्र आव्हाड समर्थक. महाराष्ट्राच्या विधीमंडळाने अनेक ऐतिहासिक निर्णय, चर्चा, कायदे मंजूर केले. सत्ताधारी आणि विरोधकांनी राजकारण अन् समाजकारणाचा मेळ घालून सभागृहाचे कामकाज चालवले. डावे आणि उजवे सर्व विचारधारांना महाराष्ट्राच्या विधीमंडळाने सन्मान दिला. मात्र आता हे विधीमंडळाच्या मर्यादा या इतिहास जमा झाल्या असल्याचे या दोन्ही नेत्यांच्या समर्थकांनी दाखवून दिले. विधानसभेच्या लॉबीमध्ये अगदी एकमेकांचे शर्ट फाटेपर्यंत समर्थकांनी हाणामारी केली. राज्याच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी एक मंदिर असलेले विधीमंडळ कधी कुस्तीचा आखाडा झाला हे लक्षातच आले नाही. शाब्दिक विरोध आता शिवीगाळ अन् मारहाणीपर्यंत पोहचला आहे. विधीमंडळाच्या आवाराने महाराष्ट्राच्या राजकारणाची ही अवस्था साश्रू डोळ्यांनी पाहिली असेल यात शंकाच नाही.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
एकेकाळी राज्यामध्ये हरित क्रांती करणारे वसंतराव नाईक यांच्या महाराष्ट्रामध्ये बळीराजा रोज रडतोय. देशामध्ये सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या या महाराष्ट्रामध्ये होत असताना कृषीमंत्री मात्र पत्त्यांचा डाव रंगवताना दिसले आहेत. राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधान परिषदेमध्ये जंगली रम्मी खेळताना व्हिडिओ समोर आला आहे. शेतकऱ्याला कर्जमाफी मिळत नसताना आणि त्याचा जीव टांगणीला लागलेला असताना कृषीमंत्री मात्र रम्मी खेळण्यात व्यस्थ आहेत. त्यामुळे बळीराजाला वाली तरी कोण? असा प्रश्न निर्माण झाला.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
यावरुन माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मागणाऱ्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना देखील सत्ताधारी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपली ‘ताकद’ दाखवून दिली. राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी लाथ्या बुक्क्या घालून WWF च्या रिंगणात मी ही कमी नाही हे दाखवून दिले. या राज्यस्तरीय राजकीय कुस्तीच्या मैदानात सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील खेळाडूंची काही कमी नाही. नागरिक आणि त्यांचे प्रश्न यावर माती टाकून आपला खेळ राजकारण्यांनी सुरुच ठेवला आहे. त्यामुळे विकासात्मक राजकारण, धोरण, विचारधारा आणि प्रगती हे प्रेक्षक लॉबीमध्ये बसून ‘राजकीय खेळ’ पाहत आहेत.