Manoj Jarange Patal targets Devendra Fadnavis
जालना : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहेत. अवघ्या काही क्षणांमध्ये निवडणूका जाहीर होणार असून आचारसंहिता लागणार आहे. आचारसंहितेनंतर महायुती सरकारला कोणाताही धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही. त्यामुळे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. मागील दोन वर्षांपासून जरांगे पाटील यांनी ओबीसीमधून मराठा आरक्षण देण्याची तीव्र मागणी केली आहे. मात्र सरकारने त्यांच्या मागणीप्रमाणे निर्णय न घेतल्यामुळे जरांगे पाटलांनी जोरदार निशाणा साधला आहे. आता अवघ्या काही क्षणात आचारसंहिता लागणार असल्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही म्हणत राज्य सरकारला खडेबोल सुनावले आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यामध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी जरांगे पाटील म्हणाले, “आमच्या मागण्यांची अजून वेळ गेलेली नाही. सर्व मागण्याची अंमलबजावणी करा. तुमचे राजकारण तुमची सत्ता तुम्हाला लख लाभ असो… मला आणि माझ्या मराठ्याला राजकारणाकडे जायचे नाही. पण तुम्ही जर मराठ्यांवर दुर्लक्ष करून अन्याय करण्यासाठी सत्ता चालवत असताल. जर तुम्ही आमची वाट लावायला चालले तर माझे मराठे तुमची वाट लावल्याशिवाय गप्प बसणार नाहीत. तुमच्या हातात अजूनही वेळ आहे. तुम्ही आचारसंहितेची तारीख पुढे ढकलून मराठ्यांना न्याय देऊ शकता,” असे मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले आहे.
हे देखील वाचा : शेवटच्या घटका मोजत असलेल्या घटनाबाह्य सरकारने…; रोहित पवारांचा घणाघात
पुढे जरांगे पाटील म्हणाले की, “आचारसंहिता लागुद्या मग त्यांनाही कळेल. या राज्यातील शेतकरी, दलित, मुस्लिम, आणि आठरा पगड जातीचे कर्तव्य काय त्यांच्या लक्षात येईन. माझे पुन्हा पुन्हा म्हणणे आहे. तुम्ही मराठ्यांकडे दुर्लक्ष करून, आमचा अपमान करू नका. तुम्ही मराठ्यांच्या छातीवर नाचून, तुम्ही सत्ता काबीज करायला बघताल, हा तुमचा गैरसमज आहे. या राज्यात मराठ्यांच्या नादी लागलेल्याचा मराठ्यांनी बिमोड केलेला आहे. ती वेळ आमच्यावर येऊ देऊ नका, आम्हाला राजकारणात जायचे नाही. तुम्ही सत्तेवर राहा किंवा, नका राहू, आमच्या मागण्याची अंमलबजावणी करा, नसता तुम्हाला अस्मान दाखवल्याशिवाय सोडणार नाही,” असा गंभीर इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आणल्यानंतर लोकसभा निवडणुकीवर त्याचा परिणाम झाला. याचा महायुतीला मोठा फटका बसला. यानंतर आता विधानसभेवर देखील यीचा परिणाम होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आचारसंहितेपूर्वी जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांना इशारा दिला आहे. ते म्हणाले की, “मराठा आरक्षणासाठी सरकारचे काय नियोजन आहे, मला माहित नाही. देवेंद्र फडवणीस यांनी मराठ्यांवर दुर्लक्ष करू नये. पुन्हा पुन्हा दुर्लक्ष केले तर, याचे दुष्परिणाम वाईट होतील. ज्या रस्त्याकडे मराठा समाजाला जायचे नाही. त्या रस्त्याकडे फडवणीस यांच्या हट्टामुळे, मराठा द्वेषीपणामुळे, मराठ्यांना विनाकारण राजकारणाच्या रस्त्यावर यावे लागेल. मराठा त्या राजकारणाच्या वाटेवर आला. तर तुमची वाट लावल्याशिवाय सोडणार नाही,” असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस व महायुतीला दिला आहे.