विधानपरिषदेचे नवनियुक्त आमदारांवरुन रोहित पवारांची टीका (फोटो - टीम नवराष्ट्र)
कर्जत : राज्यामध्ये अवघ्या काही क्षणांमध्ये निवडणूका लागणार आहेत. ३ वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद घेणार आहे. यामध्ये महाराष्ट्र आणि झारखंडची निवडणूक जाहीर होणार आहे. त्यामुळे लगेचच आचारसंहिता देखील लागणार आहे. यामुळे महायुतीच्या नेत्यांमध्ये निर्णायची सरबत्ती सुरु आहे. यामध्ये आता राज्यपालांनी रात्री उशीरा महायुतीच्या महत्त्वाच्या निर्णयावर मान्यता दिली. महायुतीने शिफारस केलेल्या सात नेत्यांनी विधान परिषदेच्या आमदारकीची शपथ घेतली. यावरुन आता महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले आहेत.
महायुतीने राजकीय क्षेत्रातील सात नेत्यांची राज्यपालांकडे शिफारस केली. विविध क्षेत्रातील मान्यवर लोकं नियुक्ती करण्याची अपेक्षा असताना राजकीय नेते आमदार होत आहेत. यामध्ये भाजपचे तीन आणि शिंदे गट व अजित पवार गटाचे प्रत्येकी दोन नेते आहेत. यामध्ये दोन महिला नेत्या आहेत. यामध्ये चित्रा वाघ, विक्रांत पाटील, धर्मगुरु बाबूसिंग महाराज राठोड, पंकज भुजबळ, इद्रीस नायकवाडी, हेमंत पाटील आणि मनीषा कायंदे या नेत्यांचा समावेश आहे. विधीमंडळामध्ये या नेत्यांचा शपथविधी सोहळा पार पडला आहे. यावरुमन मात्र महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले आहेत. ठाकरे गटाने तर हाय कोर्टामध्ये धाव घेतली असून शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे.
शेवटच्या घटका मोजत असलेल्या घटनाबाह्य सरकारने शेवटच्या दिवशी सुद्धा घटनेला तडे देण्याचे प्रयत्न सोडलेले नाही. राज्यपाल नियुक्त आमदारांचा विषय न्यायप्रविष्ट असताना देखील शेवटच्या दिवशी आमदार बनवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे.#KGF च्या गरुडा- अधिराप्रमाणे सर्व नियम कायदे बाजूला…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 15, 2024
रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत नवनियुक्त आमदारांच्या निर्णयावरुन महायुतीवर निशाणा साधला आहे. रोहित पवारांनी लिहिले आहे की, शेवटच्या घटका मोजत असलेल्या घटनाबाह्य सरकारने शेवटच्या दिवशी सुद्धा घटनेला तडे देण्याचे प्रयत्न सोडलेले नाही. राज्यपाल नियुक्त आमदारांचा विषय न्यायप्रविष्ट असताना देखील शेवटच्या दिवशी आमदार बनवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे. KGF च्या गरुडा- अधिराप्रमाणे सर्व नियम कायदे बाजूला सारून ‘हम करे सो कायदा’ या पद्धतीने वागणाऱ्या या संविधनविरोधी सरकारचा अंत केल्याशिवाय महाराष्ट्र शांत बसणार नाही. असो सरकारला सत्तेतून महाराष्ट्र हद्दपार करेल याची शाश्वती आली असावी आणि या भीतीतूनच आमदार नियुक्तीचा निर्णय घेतला असेल, अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली आहे.